ठाण्यातील एसटी बस डेपोंना तातडीने भेटी देत त्यांनी तेथील यंत्रणांना बेशिस्तपणा न खपवून घेण्याबाबत चांगलीच समज दिली. आणि त्याचबरोबर आर्थिक तोट्याच्या दुष्टचक्रात अडकून पडलेल्या एसटी महामंडळाला पुन्हा उभारी आणण्यासाठी तसेच एसटी महामंडळाकरिता नवनवीन आर्थिक स्त्रोत कसे विकसित करता येतील याकरता प्रताप सरनाईक यांनी जोमाने काम सुरू केले.
सुनील जावडेकर
हल्लीच्या प्रचंड धावपळीच्या आणि अत्यंत गतिमान काळात असे दुर्मीळ मध्यमवर्गीय अथवा निम्नमध्यम वर्गीय कुटुंब असावे की ज्यांच्याकडे दुचाकी अथवा चारचाकी गाडी घरासमोर नाही. काही वर्षांपूर्वी चारचाकी गाडी ही चैनीची वस्तू म्हणून मध्यमवर्गीय त्याकडे पाहायचे; परंतु काळाच्या ओघात आणि गतीच्या स्पर्धेत परंपरागत सर्व समज मागे पडले आणि कुटुंबामध्ये चारचाकी असणे हे गरजेचे लक्षण बनले आणि ज्या कुटुंबाकडे चारचाकी घेण्याची आर्थिक क्षमता नाही त्यांच्याकडे किमान दुचाकी तरी असतेच असते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय समाजाच्या जीवनशैलीमध्ये जो काही एक आमुलाग्र बदल झाला त्यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांची निर्माण झालेली अथवा करण्यात आलेली गरज हा एक मोठा बदल म्हणावा लागेल. मात्र असे असले तरी देखील आजही गावोगावी खेडोपाडी अगदी दुरगामी वाड्या, वस्त्यांवर पाड्यांवर केवळ पाच ते दहा रुपयाच्या नाममात्र शुल्कामध्ये हमखास नेऊन सोडणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस सेवा ही तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी आजही त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यामध्ये आणि दैनंदिन व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
ज्याप्रमाणे मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची आणि त्यातही अत्यंत गोरगरीब जनतेची खऱ्या अर्थाने रक्तवाहिनी म्हणूनच काम करत आहे. अर्थात कोणत्याही देशाची अथवा राज्याची सार्वजनिक वाहतूक यंत्रणा ही आर्थिकदृष्ट्या फायद्यामध्ये कधीच नसते त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे गेली वर्षांनुवर्षे तोट्याची कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे. सरकार येतात आणि जातातही. मात्र गोरगरिबांना अत्यंत अल्पशा भाड्यामध्ये त्यांच्या घराजवळ हक्काने नेऊन सोडणारी एसटी ही मात्र गेली वर्षांनुवर्ष दारिद्र्यात आणि तोट्याच्या दुष्टचक्रात अडकून पडलेली आहे. त्यात प्रामुख्याने सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांची एसटी महामंडळाकडे पाहण्याची दृष्टी, खासगी वाहनांचा वाढलेला अतिरेकी आणि बेसुमार वापर, अवैध प्रवासी वाहतुकीला मिळणारे पाठबळ आणि त्याचबरोबर उपद्रवी घटकांचा एसटीचे लचके तोडण्याचा सातत्याने सुरू असलेला प्रयत्न हे जे लक्षात घेतले तर केवळ आणि केवळ प्रामाणिक आणि कष्टकरी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाठबळावरच महाराष्ट्राची ही जीवन वाहिनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्वतःचे अस्तित्व राखून आहे असेच म्हणावे लागेल.
मग पगाराची कोणतीही हमी ना भविष्य निर्वाह निधीची कोणतीही शाश्वती मात्र असे असले तरी देखील ज्या निष्ठेने आणि ज्या तळमळीने एसटी महामंडळाचे कर्मचारी केवळ सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांच्या करिता हा उपक्रम जिवंत ठेवत आहेत हे खरोखरच अत्यंत धाडसाचे आणि कौतुकास्पद म्हणावे लागेल. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत ५० टक्के बस भाड्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा एक मोठा परिणाम जो परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर दिसून आला. तो म्हणजे महामंडळाच्या उत्पन्नात या निर्णयामुळे घसघशीत वाढ झाली. यामुळे कर्मचाऱ्यांना किमान महिनाभराचे वेतन तरी दोन-चार दिवस मागेपुढे का होईना परंतु मिळू लागले. अन्यथा दोन-दोन, चार-चार महिने एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळतानाही मारामारी होती आणि त्यासाठी देखील अखेरीस महामंडळाला राज्य सरकार पुढे हात पसरावे लागत होते. अर्थात आता राज्यामध्ये भाजप शिवसेना अजित पवार यांचे राष्ट्रवादी अशा भरभक्कम महायुतीचे बाहुबली बहुमताचे सक्षम महायुती सरकार सत्तेवर आहे आणि परिवहन मंत्रालयाची जबाबदारी तरुण आणि कार्यक्षमतेची चुणूक दाखवणारे नेते म्हणून समजले जाणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्यासारख्या उमद्या तडफदार मंत्र्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे. परिवहन खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर तातडीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे मीरा-भाईंदर या त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रापासूनच कामाचा श्री गणेशा सुरू केला. ठाण्यातील एसटी बस डेपोंना तातडीने भेटी देत त्यांनी तेथील यंत्रणांना बेशिस्तपणा न खपवून घेण्याबाबत चांगलीच समज दिली. आणि त्याचबरोबर आर्थिक तोट्याच्या दुष्टचक्रात अडकून पडलेल्या एसटी महामंडळाला पुन्हा उभारी आणण्यासाठी तसेच एसटी महामंडळाकरिता नवनवीन आर्थिक स्त्रोत कसे विकसित करता येतील याकरता प्रताप सरनाईक यांनी जोमाने काम सुरू केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे सर्वात मोठी जमेची बाजू जर कोणती असेल तर ते म्हणजे महामंडळाचे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरांमध्ये देखील मोक्याच्या ठिकाणी असलेले स्वतःच्या जागेतील एसटीचे डेपो आणि तेथील जागा आहे. या आधीच्या परिवहन मंत्र्यांनी देखील एसटीच्या डेपोंचा बीओटी तत्त्वावर खासगी करण्याच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केला तथापि त्याला होणारा विरोध आणि विरोधातून होणारी शेवटी कोर्टबाजी यात एसटी डेपोंचा विकास हा शेवटी अडकून पडला. परिवहन मंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम मीरा-भाईंदर येथील एसटी महामंडळाची जागा मीरा-भाईंदर महापालिकेला विकसित करण्यासाठी दिली आणि त्यामुळे आता मीरा-भाईंदरमधील एसटीच्या या जागेचा चेहरा मोहरा पूर्णत: बदलणार आहे. त्याचबरोबर सरनाईक यांनी आणखी एक नवीन निर्णय घेतला आहे तो म्हणजे एसटी डेपोमध्ये एसटीचे स्वतःचे डिझेलचे पंप आहेत हे ऑइल कंपन्यांना चालवण्यास देऊन त्याद्वारे एसटी महामंडळाला वाढीव उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत निर्माण करता येऊ शकेल असे त्यांचे प्रयत्न आहेत. त्याचबरोबर भाडेतत्त्वावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेऊन आगामी काळात ५०० नवीन बस गाड्या घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे. एसटी महामंडळ तोट्यातून जर फायद्यात येणार असेल, तर निश्चितच अशा धाडसी निर्णयांचे स्वागतच केले पाहिजे मात्र त्याचबरोबर हे धाडसी निर्णय अंगावर येणार नाहीत याची देखील काळजी परिवहन मंत्र्यांनी तसेच राज्य सरकारने घेण्याची गरज आहे.
उत्पन्नाचे वाढीव स्त्रोत शोधताना एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे महाराष्ट्रात जी मोठ्या प्रमाणावर खासगी अवैध प्रवासी वाहतूक फोफावलेली आहे तिला जर प्रतिबंध करायचा असेल, तर केवळ कायदे अथवा नियमांचा धाकदपटशा दाखवून अवैध प्रवासी वाहतूक बंद होणार नाही, तर त्या पलीकडे जाऊन यामध्ये अधिक काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला जोडून असलेले काही शेजारी राज्य की जी पर्यटनदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्या महाराष्ट्राशी एकरूप आणि समरूप झाली आहेत अशा राज्यांमध्ये जर का महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून किमान पर्यटनाच्या हंगामामध्ये जरी खासगी आरामदायी बस सेवेसारखी दर्जेदार व सेवा एसटी महामंडळाकडून या मार्गांवर जर का प्रवाशांना उपलब्ध होऊ लागली, तर निश्चितच खासगी बस सेवेकडील प्रवाशांचा ओघ हा एसटी महामंडळाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, प्रयत्नांची शिकस्त, एसटीच्या कामात सुसूत्रता, शिस्तबद्धता आणि सचोटीची नितांत गरज आहे. तरच महाराष्ट्राची लाडकी लालपरी ही आगामी काही वर्षांत अधिक स्मार्ट दिसू शकेल.