राजापूर : कोंबडीची शिकार करताना बिबट्या खुराड्यात अडकला. अखेर वन विभागाच्या पथकाने खुराड्यातून बाहेर काढून बिबट्याला जीवदान दिले. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार करक तांबळवाडी येथील आत्माराम कांबळे यांच्या खुराड्यामध्ये एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या अडकला होता. या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात अर्थात घनदाट जंगलात सोडून देण्यात आले.
अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही, हत्या; मारेकरी पोलिसांना होणार शिक्षा
कोंबडीची शिकार करण्याच्या उद्देशाने आलेला बिबट्या लोखंडी खुराड्यात शिरला आणि अडकला. बिबट्या खुराड्यात अडकल्याचे बघून आत्माराम कांबळे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वन विभागाला कळवले. यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन बिबट्याला खुराड्यातून बाहेर काढले आणि नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. यासाठी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रीन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. यानंतर लांबून खुराड्याच्या तारा कापून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यात आले. नंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.
बिबट्याच्या सुटकेची कारवाई वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांक लगड,वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यासाठी रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार , वनपाल राजापूर जयराम बावदाणे , वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक जालने आणि रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे , निलेश म्हादये आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे केली.
वन्यजीव नागरी वस्तीत किंवा आसपास आढळले तर वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ येथे संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी केले.