नवी दिल्ली : कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची तयारी सुरू आहे. ही तयारी करत असताना भारतीय लष्कराच्या ‘डेअरडेव्हिल्स’नी विश्वविक्रमाची नोंद केली. सात मोटारसायकलवर ४० जण स्वार झाले. या ४० जणांनी मोटारसायकलवर एकमेकांच्याआधारे उभारलेल्या मानवी मनोऱ्याची उंची २०.४ फूट एवढी होती. विशेष म्हणजे या मानवी मनोऱ्याने कर्तव्यपथावरुन विजय चौक ते इंडिया गेट असा दोन किमी. चा प्रवास केला. भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सने हा विश्वविक्रम केला. या नव्या कामगिरीसह मोटारसायकलस्वारांच्या पथकाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड , एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. आतापर्यंत भारताच्या मोटारसायकलस्वारांच्या पथकाने तब्बल ३३ विक्रमांची नोंद केली आहे.
भारतात पहिल्यांदा १९३५ मध्ये मोटारसायकलस्वारांच्या पथकाची स्थापना करण्यात आली. इंग्रजांच्या काळात रॉयल इंडियन आर्मीतील सदस्यांना निवडून हे पथक तयार करण्यात आले होते. वेळोवेळी या पथकातील जुन्या सदस्यांना निरोप देऊन तरुणांना संधी देण्याची परंपरा जपण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यावर ही परंपरा भारतीय लष्कराने पुढे कायम ठेवली. ‘डेअरडेव्हिल्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पथकाने १९३५ पासून आतापर्यंत १६०० पेक्षा जास्त वेळा चित्तथरारक कसरती करुन उपस्थितांची मनं जिंकली आहेत.
Jyotiba Temple : ज्योतिबाचं दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार
प्रजासत्ताक दिनाचे संचलन, लष्कर दिनाचे संचलन, लष्कराचे वेगवेगळे कार्यक्रम आदी महत्त्वाच्या प्रसंगी ‘डेअरडेव्हिल्स’ मोटारसायकलवरुन चित्तथरारक कसरती करतात. आता रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर ‘डेअरडेव्हिल्स’ पुन्हा एकदा चित्तथरारक कसरती करतील. या सोहळ्यासाठी दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.