राज चिंचणकर
अखिल महाराष्ट्रात वर्षभरात अनेक एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांतून नवनवीन लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींची रंगभूमीवर ‘एन्ट्री’ होत असते. सन २०१६ या वर्षी एकांकिकांच्या विश्वात मात्र एक आगळावेगळा ‘प्रयोग’ केला गेला. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांत, खेडोपाडी संवादाचे माध्यम असलेल्या ‘बोलीभाषा’ हा या प्रयोगाचा केंद्रबिंदू होता आणि त्यातून थेट बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची मुहूर्तमेढच रोवली गेली. या सगळ्या प्रयोगाची उत्पत्ती मात्र एका वेगळ्याच घटनेमुळे झाली आहे. ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून या संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केलेल्या भाषणात, नाट्यसृष्टीतल्या यशाचे श्रेय त्यांनी बोलीभाषेतल्या त्यांच्या ‘वस्त्रहरण’ या विक्रमी नाटकाला दिले होते. त्याचवेळी, बोलीभाषेतली नाटके किंवा एकांकिका रंगभूमीवर सादर व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या अपेक्षेला ज्येष्ठ नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी प्रतिसाद देत, थेट बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून नवीन व्यासपीठच निर्माण केले.
त्याआधी अनेक वर्षांपासून गोविंद चव्हाण यांनी त्यांच्या ‘सुप्रिया प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेद्वारे बऱ्याच नाट्यकृती रंगभूमीवर आणल्या होत्या. बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी त्यांना महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि बोलीभाषांचा हा उत्सव सक्षम मार्गावर पावले टाकत असल्याची पावती त्यांना मिळाली. मात्र कोरोनाच्या काळात गोविंद चव्हाण यांचे निधन झाले आणि हा प्रयोग थांबतो की काय, अशी शंका उपस्थित झाली. पण त्यांची कन्या सुप्रिया चव्हाण हिने ‘शो मस्ट गो ऑन’चे व्रत अंगिकारत बोलीभाषा प्रयोगांचा वसा अखंड पुढे सुरू ठेवला. त्यावेळी ‘व्हिजन व्हॉइस अँड अॅक्ट’ उपक्रमाचे सर्वेसर्वा व रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर तिच्या पाठीशी उभे राहिले. कोरोना प्रादुर्भावाचा काळ वगळता बोलीभाषा एकांकिकांचा हा प्रयोग आजही अव्याहत सुरू आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत पुरस्कार देतानाही स्तुत्य असा मार्ग अवलंबला जातो. ज्येष्ठ रंगकर्मींच्या स्मृतींची जपणूक करण्याच्या हेतूने त्यांच्या स्मरणार्थ पारितोषिके यात दिली जातात, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.
यंदा या स्पर्धेचे आठवे वर्षे आणि त्याचबरोबर, ‘सुप्रिया प्रॉडक्शन्स’चे यंदाचे २५ वे वर्ष असल्याने या स्पर्धेचा उत्साह मोठा होता. यावर्षी प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून सात एकांकिकांची अंतिम फेरी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगली. यात जुन्नरी, वऱ्हाडी, मराठवाडी, पुणेरी-कोल्हापुरी, घाटी, लमाण-बंजारा अशा विविध बोलीभाषांतून सादर झालेल्या नाट्यकृतींचे प्रतिबिंब पडले आणि एकूणच हा प्रयोग सत्कारणी लागला. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषा रंगभूमीवर अवतरतात, त्यांची जोपासना होते आणि रसिकांनाही या बोलीभाषांची ओळख होते; हे या संपूर्ण प्रयोगाचे फलित म्हणायला हवे.