मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने पण झाले नाही तोच महाविकास आघाडीचा फुगा फुटला आहे. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने संजय राऊत यांनीच टाचणी लावली आणि महाविकास आघाडीचा फुगा फोडला आहे. पत्रकारांपुढे बोलताना उद्धव ठाकरेंच्या संमतीने बोलतोय असे सांगत संजय राऊत यांनी महापालिकांच्या निवडणुका पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केल्याचे जाहीर केले.
दिल्लीत इंडी आघाडी आणि महाराष्ट्रात मविआमध्ये फूट
दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर होताच इंडी आघाडीत आणि मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांची चर्चा सुरू होताच राज्यातील मविआमध्ये फूट पडली आहे. दिल्लीत केजरीवालांची आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. तर राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंच्या गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
आघाडीचं काय व्हायचं ते होऊ दे – संजय राऊत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिउबाठा मुंबई – ठाण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. आता आघाडीचं काय व्हायचं ते होऊ दे. पण आमच्या माणसांना संधी मिळायला हवी यासाठी स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले. राऊतांच्या घोषणेचे उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. काँग्रेसच्या निवडक स्थानिक नेत्यांनीही सर्व पक्षांनी स्वबळावर महापालिका लढवल्या पाहिजेत अशा स्वरुपाची भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांविरोधात महाविकास आघाडी नावाची आघाडी मैदानात नसेल तर तीन चार प्रमुख विरोधी पक्ष स्वबळावर उभे असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आघाडी फुटली आणि महायुती राहिली तर राजकीयदृष्ट्या फायद्यात कोण राहणार यावरूनही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याआधी २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेना अशी निवडणूकपूर्व युती जाहीर झाली होती. पण निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी युती तोडून काँग्रेस आणि शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण दोन – अडीच वर्षात परिस्थिती बदलली. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. कालपर्यंत डोळे झाकून समर्थन करणाऱ्या अनेकांनी उद्धव यांच्या निर्णयांबाबत नाराजी व्यक्त केली. बंगल्यात बसून आदेश देत पक्ष चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंसमोर राजकीय अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली. एवढे झाले तरी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत राहण्याचा निर्णय कायम ठेवला. पण लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांनंतर केंद्रात आणि राज्यात भाजपाच्या नेतृत्वात सत्ता आली आणि महाविकास आघाडी सत्तेपासून दूर झाली. आता महापालिकांच्या निवडणुकीत आघाडीत राहिल्यास कमी जागांवर निवडणूक लढवावी लागेल याची जाणीव होताच उद्धव ठाकरेंच्या गटाने स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात केली.
मुंबई, ठाणे या दोन मोठ्या महापालिकांमध्ये अनेक वर्षे सत्ता राखणाऱ्या उद्धव ठाकरे गटाने आता तडजोड केली तर महत्त्वाच्या शहरांतील राजकीय महत्त्व कमी होईल, या भीतीतून स्वबळाची भाषा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावयचंच आहे असं संजय राऊत म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या गेल्या. यानंतर संजय राऊत यांनी स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले.
संजय राऊतांच्या घोषणेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, हे जसं तुम्हाला कळत नाही, तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही; असे मंत्री उदय सामंत म्हणाले. असुरक्षिततेच्या जाणीवेतून स्वबळाची भाषा सुरू झाली आहे, अशीही प्रतिक्रिया संजय राऊतांच्या घोषणेवर उदय सामंतांनी दिली.
महाविकास आघाडी राहिली काय आणि तुटली काय ?
महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाने राज्यातील सर्वच्या सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन आघाडीच्या ऐक्याला छेद दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटली असल्याचं सांगितलं जात आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी राहिली काय आणि फुटली काय? त्याच्याशी आम्हाला घेणं – देणं नाही; या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…