मुरुड : काशीद समुद्र किनारी पोहताना प्रतिक प्रकाश सहस्रबुद्धे या ३१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना जैनवाडी जनता वसाहत, साईबाबा मंदिराजवळ घडली. पर्यटक सहस्रबुद्धे मित्रांसह पुण्याहून काशीदला आला होता. ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने पुन्हा एकदा पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील पर्यटक काल थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी भाड्याने रिक्षा घेऊन प्रतिक प्रकाश सहस्रबुद्धे, गणेश नितिन सहस्रबुद्धे, रिक्षा चालक -शदाब अविद मलीक, राकेश राजु पवार हे चौघे मित्र फिरण्यासाठी आले होते. दुपारच्या दरम्यान चौघे मित्र समुद्राच्या पाण्यात पोहण्यास उतरले होते. पोहुन झाल्यानंतर स्पोर्ट बाईकवर फिरु असा बेत ठरला त्याकरिता आपल्या गाडीतुन पैसे आणण्याकरिता बाहेर आले आणि प्रतिक सहस्रबुद्धे हा पाण्यात पोहत राहिला. तिघांना वाटलं की प्रतिक ही पाण्यातुन बाहेर आला असेल आणि कुठे तरी फिरत असेल. दिड तासानंतर प्रतिक सहस्रबुद्धे हा पाण्यात तरंगताना लाईफ गार्ड यांना दिसला ताबडतोब घटनास्थळी असलेले पोलिस व लाईफ गार्ड समुद्राच्या पाण्यात उतरून प्रतिक सहस्रबुद्धे यांना बाहेर काढले. परंतु, प्रतिक हा प्रतिसाद देत नसल्याने त्यास पोलिसांनी ताबडतोब मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्रतिक सहस्रबुद्धे हे आधीच मयत झाले आहेत असे डॉक्टर यांनी सांगितले. ही माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व पोलीस हवालदार -हरि मेंगाळ घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात मुरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास मुरुड ठाण्याचे पोलीस हवालदार- हरि मेंगाळ हे करीत आहेत.