Thursday, July 10, 2025

Mumbai : ई विभागातील बांधकाम प्रकल्‍पांवर निर्बंध

Mumbai : ई विभागातील बांधकाम प्रकल्‍पांवर निर्बंध

मुंबई : वातावरणीय बदलामुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता, पालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. पालिकेने निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार, आवश्‍यक ती सर्व कार्यवाही विकासकांना करावीच लागेल. तसेच, जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रात येत नाही तोपर्यंत ई विभागातील बांधकाम प्रकल्‍पांवरील निर्बंध कायम राहतील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणा-या बांधकाम प्रकल्‍पांवर कठोर कार्यवाही करावी, असे स्‍पष्‍ट आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.



मुंबई शहरातील वायू प्रदूषण नियंत्रित करण्‍यासाठी पालिकेने सक्‍त उपाययोजना लागू केल्‍या आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणून ज्‍या परिसरांमध्‍ये हवा गुणवत्‍ता निर्देशांक वाईट अथवा अतिवाईट श्रेणीत आहे, तेथील बांधकामे सरसकटपणे पूर्णत: बंद करण्‍यात आली आहेत. यामध्‍ये भायखळा आणि बोरिवली पूर्व यांचा प्रामुख्‍याने समावेश आहे. बांधकामे थांबविल्‍यानंतर प्रत्‍यक्ष क्षेत्रावर काय स्थिती आहे, हे जाणून घेण्‍यासाठी पालिका आयुक्तांनी भायखळा येथील बांधकाम प्रकल्‍पांना भेट देऊन पाहणी केली.





आयुक्त म्‍हणाले की, बांधकामाधीन इमारतीला चोहोबाजूंनी हिरवे कापड / ज्युट / ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त केलेले असावे. बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचा पत्रा / धातूचे आच्छादन असावे. बांधकामांच्‍या ठिकाणी असलेल्‍या राडारोड्याची तातडीने विल्‍हेवाट लावावी. प्रकल्‍पस्‍थळी बेवारस वाहने असू नयेत. प्रकल्‍पांच्‍या ठिकाणी ये-जा करणा-या वाहनांची चाके नियमितपणे धुतली जावीत, त्‍यासाठी आवश्‍यक यंत्रणा विकासकांनी उभारणे गरजेचे आहे. त्‍याचप्रमाणे संबंधित प्रकल्‍पांमध्‍ये देखील वायू प्रदूषण मोजणारी व वायू प्रदूषण नियंत्रण करणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित असणे सक्‍तीचे आहे. सर्व यंत्रणा व उपाययोजना कार्यान्वित झाल्‍या म्‍हणून विशिष्‍ट प्रकल्‍पाला लगेच बांधकाम सुरू करण्‍याची परवानगी दिली जाणार नाही. संपूर्ण भायखळा (ई विभाग) परिसरातील वायू प्रदूषण नियंत्रणात येत नाही, तोवर निर्बंध कायम राहतील.

Comments
Add Comment