प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
मावळत्या वर्षात साहित्य क्षेत्रातील घडामोडींचा थोडासा आढावा’ असे जरी शीर्षक असले तरी एका वर्षात अशा तऱ्हेने सर्व घडामोडींना एका वर्षात बंदिस्त करता येत नाही. अनेक वर्षांपासून चाललेल्या घटनांचा, त्या वर्षात झालेला फक्त तो परिपाक असू शकतो, हे सुज्ञ वाचक म्हणून आपण जाणताच!
अनेक वर्षांचा मराठी संस्थाचा, व्यक्तींचा पाठपुरावा यामुळे ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यामुळे केंद्रात आणि राज्यांमध्ये मराठी भाषा प्रगतिपथावर जाणार आहे. नवीन ‘संशोधन केंद्रे’ उभारली जाणार आहेत. प्राचीन ग्रंथांचे जतन, भाषांतर, डिजिटायझेशन, प्रकाशन केले जाणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही पुरस्कार दिले जाणार आहेत. शैक्षणिक, संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या सगळ्यांसाठी दोन वर्षांत या निर्णयाची अंमलबजावणी अपेक्षित आहे. यासाठी प्राथमिक अंमलबजावणी सांस्कृतिक मंत्रालयाकडून होणार आहे. यामुळे भारतातील ४०० हून अधिक विद्यापीठांत ‘मराठी भाषा’ शिकविली जाऊ शकते. आजच्या काळात अनेक ग्रंथालये वाचकांअभावी बंद पडत आहेत. वाचकवर्गाला या ग्रंथालयांकडे वळवणे आणि ग्रंथालयांना आर्थिक पाठबळ मिळाल्यावर डिजिटललायझेशन वा अनेक इतर सोयीसुविधा उपलब्ध होऊन महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळही निश्चितपणे सशक्त होतील.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ‘कोरोनाचे सावट’ हे साहित्यातून प्रगट होत होते तसे या वर्षात कोणतेही पुस्तक मला तरी कोरोना या परिस्थितीवरचे वाचायला मिळाले नाही. कालाय तस्मै नमः अगदीच या वर्षातील असे म्हणता येणार नाही पण अलीकडच्या काळात वास्तववादी लिहिण्याकडे साहित्यिकांचा कल वाढलेला आहे. कदाचित ऐतिहासिक, वैचारिक वगैरे साहित्य निर्मितीसाठी प्रचंड वेळ द्यावा लागतो, अभ्यास करावा लागतो यामुळे असेल किंवा वास्तववादी आणि अलीकडच्या काळातले साहित्य यात वाचकांची रुची वाढलेली असेल, या दृष्टीनेही असेल कदाचित; परंतु आपण ज्यांना ‘रियल हिरोज’ म्हणतो अशी चरित्रे मराठीत प्रमाणात येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. माणसाच्या स्वाभाविकपणे त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात कोणालाही डोकवायला आवडते या दृष्टीनेही कदाचित चरित्र आणि आत्मचरित्र मोठ्या प्रमाणात विकली जात असावीत. पण अशा प्रेरणा देणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान देणाऱ्या पुस्तकांची साहित्य क्षेत्राला गरजही आहे.
कथा, कादंबरी आणि व्यक्तिचरित्रे यांना जास्त मागणी आहे. कविता आणि समीक्षा प्रकाराला सर्वात कमी वाचक मिळतात, असे त्याचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विविध पुस्तक महोत्सव आणि पुस्तक प्रकाशनावेळी विक्री समाधानकारक होत असली तरी आणखी वाढ होणे अपेक्षित आहे, ही त्यांची अपेक्षा ही रास्त आहे. आजच्या काळचा तरुण प्रकाशक असल्यामुळे गीतेश शिंदे यांनी साहित्यकृतीच्या विक्रीबद्दलही माहिती दिली ती अशी की, आज-काल ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या साईट्सवरून तसेच सोशल मीडियाच्या ऑनलाईन माध्यमातून थेट घरपोच पुस्तके मिळत असल्यामुळे वाचकांची विशेषत: तरुणांची त्यास पसंती मिळते आहे. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जिथे पुस्तक विक्रेते अथवा ग्रंथदालने नाहीत तिथून अधिक मागणी आहे. पुस्तकाच्या वाचक हा मुख्यत्वे ५० वयोगटाच्या पुढचा आहे, त्यामुळे मराठी बालक आणि तरुण हा वाचनाकडे कसा वळवायचा यासाठी अनेक योजना आखल्या जातात. ‘कथा वाचून त्याला शीर्षक द्या’ किंवा ‘कथेवर आधारित चित्र काढा’ अशा तऱ्हेचे उपक्रम शाळा आणि महाविद्यालय स्तरावर मराठी वाङ्मय मंडळाद्वारे घेतले जातात, असे एका शाळेत पाहुणे म्हणून गेले असता शिक्षकांनी सांगितले.
एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीलाच एक रंगीत धागा आणि रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे मणी दिले जातात. त्या वर्षात जेव्हा केव्हा एक एक पुस्तक वाचून होईल तेव्हा एक मणी त्या धाग्यात सरकवायचा आणि त्यासोबत दिलेला नोंदवहीत पुस्तकाविषयीची निरीक्षणे नोंदवायची ज्याच्यात लेखक, पुस्तक, प्रकाशकाच्या नावासहित संक्षिप्त स्वरूपात कथाबीज किंवा पुस्तकाचा गाभा नोंदवायचा, असा उपक्रम विद्यार्थ्यांना दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांची मण्यांची माळ मोठी असेल त्याला पारितोषिक दिले जाते. अशा तऱ्हेचे वाचन संस्कृतीला बळ देणारे वेगवेगळे अभिनव उपक्रम शाळा आणि महाविद्यालये घेतात हे पाहून खूप आनंद झाला.
साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मराठी भाषेत शिकलेली पिढी टिकवण्याची गरज आहे; परंतु मराठी शाळा बंद पडत आहेत, या पार्श्वभूमीवर शासनाच्या धोरणांवर फक्त अवलंबून राहून चालत नाही तर मराठी कुटुंबीयांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत पाठवण्याची गरज आहे. कमीतकमी पहिल्या वर्गापासून ते बारावीपर्यंत तरी मराठीला इतर कोणतेही पर्याय ठेवता कामा नये. महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी ‘मराठी’ ही भाषा शिकेल, हे पाहिले पाहिजे!
मराठी साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये यावर्षी वाढ झालेली आहे, ही एका दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे.
तळागाळातूनही पुस्तके स्पर्धेसाठी येतात आणि बक्षीसपात्र ठरतात तेव्हा त्याची नोंद घेतली जाते. असे छोटे- मोठे पुरस्कार लिहित्या हातांना प्रोत्साहन देतात, बळ देतात. अलीकडे ई- पुस्तके, ई- मासिके प्रकाशित करण्याकडे लेखकांचा प्रकाशकांचा कल वाढला आहे, हे लक्षात घेऊन यावर्षी प्रथमच अनेक संस्थांनी ई-साहित्यकृतींचा पुरस्कारासाठी विचार केला, ही आनंददायी गोष्ट आहे. मुंबई मराठी साहित्य संघानेही मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा जाहीर केली त्यात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्यासमोरील आव्हाने’ यासारख्या आजच्या काळातील विषय जाणीवपूर्वक विचारात घेतला, जेणेकरून तंत्रज्ञानात प्रगतीपथावर असलेला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मितीकडे वळू शकेल! तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी साहित्याचे जतन करणे, हे अलीकडच्या काळात सुरू झालेले काम, या वर्षभरातही जोमाने सुरू आहे, ते तसेच आगामी काळातही चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करते!
एकंदरीत काय तर समाज जीवनाचा आरसा असलेले साहित्य ‘प्रमाणभाषा’, ‘बोलीभाषा’, ‘तंत्रज्ञानातील भाषा’ यातून यावर्षी निश्चितपणे प्रकट झालेले आहे, हे मात्र निश्चितच! फक्त त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येक वाचकावरही अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे!