कथा – प्रा. देवबा पाटील
भारतीय विज्ञान संस्थेमधील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक होते. ते नेमाने दररोज सकाळी त्यांच्या शेतावर फिरायला जायचे. फिरून आल्यानंतर त्यांच्या पुतण्याच्या मुलाचा म्हणजेच नातवाचा स्वरूपचा नियमित अभ्यास घ्यायचे. रोज रात्री पुन्हा ते स्वरूपचा नियमित अभ्यास घ्यायचे. त्यामुळे बुद्धीने आधीच हुशार असलेल्या स्वरूपची अभ्यासात चांगलीच प्रगती होत होती.
ते हिवाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी स्वरूपचा १२ वा वाढदिवस होता. नेहमी कधीच लवकर न उठणारा स्वरूप प्रत्येक वाढदिवशी मात्र थंडी असूनही हमखास लवकर उठायचा. तसाच या १२ व्या वाढदिवशी सुद्धा तो लवकर उठला. बघतो तर आनंदराव आजोबा पायात बूट घालीत घराबाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यांना बघताच स्वरूप म्हणाला, ‘‘आजोबा! एवढ्या सकाळी सकाळी इतक्या मोठ्या थंडीत तुम्ही कोठे निघालात हो?’’
‘‘फिरायला
जातो बाळा.’’
आनंदराव म्हणाले.
‘‘आजोबा फिरायला कशासाठी जातात हो? मी येऊ का तुमच्यासोबत फिरायला?’’ स्वरूपने विचारले.
सूर्यवंशी स्वरूपने असे म्हणताच आनंदरावांना आश्चर्यही वाटले व आनंदही झाला. ते आनंदाने म्हणाले, ‘‘हो हो! चल. पण आधी आई-बाबांना विचार. अंगात स्वेटर घाल नि कानाला मफलर बांध. कारण बाहेर खूप थंडी पडली आहे. तसेच हातमोजेही घे आणि पायातही बूट व मोजेही घाल,’’ आनंदरावांनी स्वरूपला सांगितले. स्वरूपने आईजवळून या सर्व गोष्टी आणून आजोबांच्या सहकार्याने तशी जय्यत तयारी केली.
सकाळच्या शीतल झुळका मनाला प्रफुल्लित करीत होत्या. सूर्योदयास जरा थोडासा वेळ होता तरी सकाळच्या उजाडण्याआधीच्या अंधुक प्रकाशात ती हिरवळ डोळ्यांना सुखद प्रसन्नता देत होती. झाडांवर पाखरांची किलबिल सुरू झालेली होती. अशा प्रसन्न वातावरणात स्वरूपसुद्धा पाखरांसारखा किलबील करीत आनंदरावांसोबत मोठ्या आनंदात गडबड, बडबड करीत चालत होता. असे ते दोघे आजेनाते फिरत असताना आनंदराव म्हणाले, ‘‘स्वरूप, तू दररोज सकाळी खूप उशिरा उठतो. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले नाही. आज मी तुला सकाळी लवकर उठून फिरण्याचे महत्त्व सांगतो.’’
स्वरूपचा आजोबांवर गाढ विश्वास होता. तो आनंदाने म्हणाला, ‘‘हो आजोबा. जरूर सांगा. मी पूर्णपणे तुमचे ऐकेल. त्याने माझा आळस तरी निघून जाईल.’’
‘‘फिरण्यामुळे आपल्या शरीराला व्यायाम होतो. शरीर ताजेतवाने व निरोगी राहते. मन प्रसन्न होते व दिवसभर आनंदी राहते. आपली दिवसभराची कामे करण्यासाठी लागणारी ऊर्जा या फिरण्यातून प्राप्त होते. शरीरातील आळस निघून जातो. मग आपणास आपली कामे करण्यात उत्साह वाटतो. सकाळी हिरव्या झाडांच्या मोकळ्या जागेत, शेतात, बगीचात, रानात ही शुद्ध हवा विपुल प्रमाणात असते.’’ आजोबांनी सांगितले.
‘‘मग आजोबा या हवेचे एवढे काय महत्त्व आहे?”” स्वरूपने प्रश्न विचारला.
आनंदराव सांगू लागले, ‘‘एक वेळ अन्न व पाणी यांशिवाय माणूस काही वेळ जगू शकेल; परंतु शुद्ध हवेशिवाय मात्र माणूस क्षणभरही जगू शकत नाही एवढे शुद्ध हवेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शुद्ध हवेमध्ये जीवनासाठी, जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा प्राणवायूचा भरपूर साठा असतो. म्हणून सकाळी सकाळी हिरवळ असलेल्या मोकळ्या रस्त्याने फिरायला जावे म्हणजे पहाटेची शुद्ध, ताजी, स्वच्छ, शीतल व भरपूर प्राणवायू असलेली हवा श्वासावाटे आपल्या शरीरात जाते. आपल्या आरोग्यासाठी ही शुद्ध हवा खूप उपयोगी असते.””
असे गप्पा गोष्टी करीत करीत दोघेही घरी आले. घरी येताबरोबर स्वरूप त्याच्या आईला म्हणाला, ‘‘आई, आता मी दररोज सकाळी लवकर उठेल व आजोबांसोबत फिरायला जात जाईल.’’
आजोबांनी नातावर काय जादू केली अशा विचाराने आईने हसत हसत त्याला ‘‘हो बाळा, रोज जात जा आजोबंासोबत फिरायला.’’ असे म्हटले आणि आपली घरकामे करण्यासाठी आनंदात घरात निघून गेली.