मुंबई : मसाजोगचे तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे व देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जावा ही माझी पहिल्या दिवसापासून ची मागणी आहे असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
धनंजय मुंडे यांनी गुरुवारी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारत विभागाचा आढावा घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे संपन्न झालेल्या या आढावा बैठकीनंतर धनंजय मुंडे माध्यमंशी बोलत होते.
Chitra Wagh : नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार : चित्रा वाघ
बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या झाली, हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकेच भयानक आहे, त्यामुळे यातील कुठल्याही आरोपीचे, तो कुणाच्याही जवळचा असला तरी समर्थन केले जाऊ शकत नाही, त्यामुळे सरकार म्हणून या प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही तसेच या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास वेगाने सुरू असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की या घटनेच्या आडून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांकडून वेगळ्या पद्धतीचे राजकारण केले जात आहे. मला मंत्री पद मिळू नये, पालकमंत्री पद मिळू नये, यासाठी या घटनेचे दुर्दैवी राजकारण केले गेले व यातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. काही जणांचा तर दिवसच माझ्यावर टीका करण्यात व या घटनेशी कसलाही संबंध नसताना तो जोडायचा प्रयत्न करण्यात उजडतो आहे.