Tuesday, April 28, 2026

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश
Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लग्न समारंभासाठी निघालेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला. आनंदाचा क्षण असताना कुटुंबावर अशाप्रकारे दुःखांचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून एका लग्न समारंभासाठी नांदे कुटुंब निघाले होते. वरूड ते मोर्शी महामार्गावरून प्रवास करत असताना खडका फाट्याजवळ त्यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि यानंतर ते भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन जोरात धडकले. ही धडक इतकी जोरात होती की वाहनाचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. (Amravati accident) या दुर्दैवी अपघातात नांदे कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. किरण नांदे, समाधान नांदे, आणि दिया नांदे (३ वर्ष) अशी या तिघांची नावे आहेत. या अपघातात गोपाल नांदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या भीषण धडकेतून ते बचावले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. (Amravati accident) या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. एका तीन वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाल्याने उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा