Tuesday, April 28, 2026

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर
लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५ वर्षीय शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला असून, उष्माघातामुळेच हा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्र्यंबक नारायण बेळंबे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते मेहनती व कष्टाळू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जनावरांसाठी चारा कापत होते. दरम्यान, उन्हाचा कडाका वाढलेला असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. शेजारील शेतकऱ्यांनी व नातेवाईकांनी तातडीने त्यांना उचलून पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. अधिकृत कारण स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून बेळंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लातूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या वेळेत तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असून उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. यापूर्वी उष्माघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आजच्या घटनेमुळे हा आकडा चारवर पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर आच्छादन ठेवणे, हलका व सैलसर पोशाख वापरणे तसेच गरज नसल्यास उन्हात काम करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः शेतकरी व मजूर वर्गाने कामाचे वेळापत्रक सकाळी किंवा सायंकाळी ठेवावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे ग्रामीण भागात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून, प्रशासनानेही प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा