नागपूर : कल्याण येथे मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणार्या अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) नावाच्या परप्रांतीय व्यक्तीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून निलंबित केले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत केली.
कल्याण येथील योगीधाम परिसरातील ‘अजमेरा हाईट्स’मध्ये रहाणार्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांच्या शेजारी रहाणार्या देशमुख कुटुंबियांना गुंडांकरवी मारहाण केली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शुक्लावर गुन्हा नोंद केला; पण त्यांना अटक करण्यात दिरंगाई झाली. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हे सूत्र विधान परिषदेच्या पटलावर मांडले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत निवेदन करत वरील घोषणा केली. या वेळी त्यांनी सभागृहाला मुंबई आणि परिसरातील मराठी माणसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
शुक्ला कुटुंबावर गुन्हा नोंद!
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, अखिलेश शुक्ला हा ‘एम.टी.डी.सी.’चा कर्मचारी आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नीवर मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर खडकपाडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीची प्रत माझ्याकडे आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे. पुढील कारवाई पोलीस करतील. या प्रकरणी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.
CAG Report : महाराष्ट्रात रस्ते बांधकामातील दिरंगाईमुळे २०३ कोटींचे नुकसान
मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, होता आणि राहील. कधीकधी काही नमुणे अशी चुकीची विधाने करतात, माज आणल्यासारखे वागतात; पण सरकार अशा (Akhilesh Shukla) माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय रहाणार नाही. राष्ट्रीय अस्मितेनंतर मराठी ही आपली क्षेत्रिय अस्मिता आहे. त्यावर कुणी घाला घालणार असेल, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही.