वैष्णवी भोगले
हिवाळा सुरू झाला की, मुंबईत अनेक ठिकाणी कोकण महोत्सव भरविले जातात. मुंबईत कामानिमित्त आलेल्या कोकणी पोरांनी शहरात येऊन महोत्सवामधले दशावतार बघणे म्हणजे मला थोडं नवलच वाटायचे आणि हे बघत असतांना मला कोकणातले हिवाळ्यातले दिवस आठवू लागले.
पावसाळा संपून कुडकुडणाऱ्या थंडीला सुरुवात झाली की मंदिरात टीपर, सप्ते, जत्रा, उत्सवांना सुरुवात व्हायची. मंदिरातील जत्रा म्हणजे तळ कोकणाची वेगळीच ओळख. गावातील लोकांनी एकत्र यावे, हा त्या मागचा हेतू होता. यात्रा, उत्सव साजरे होण्यामागचे प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिरात किंवा मांडावर सादर होणारा दशावतार. ज्या गावात दशावतार रात्री होणार असेल तो गाव आणि मंदिराचा परिसर सकाळपासून एका वेगळ्या वातावरणाने भारावून गेलेला असतो. त्या ठिकाणी जत्रेची दुकाने, स्त्रियांचे देवीला ओटी भरणे, देवळातील गुरवांचे गाऱ्हाणे, अगरबत्ती आणि धुपाचा सुगंध अशा वातावरणात जेव्हा दशावतारी नाटकात काम करणारे धिप्पाड कलाकार मंदिराच्या आवारात प्रवेश करतात. त्यावेळी त्यांना पाहिल्यावर ‘बालगंधर्वांची रुक्मिणी’ जशी म्हणते, ‘दादा ते आले ना? ‘ असेच शब्द प्रत्येकाच्या अंतर्मनात उमटतात. शेकडो वर्षांची ही परंपरा असलेली ही लोककला आजही कोकणात जपली गेलेली आहे ते या कलाकारांमुळेच.
दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. गोवा, सिंधुदुर्गमध्ये दशावतार तर रत्नागिरी, रायगडमध्ये ‘नमन’ असा या कलेचा प्रवास होत गेला. दशावतार पाहण्यासाठी कोकणी माणूस नेहमीच उत्सुक असतो, म्हणूनच कोकणात दशावतार हा जिव्हाळ्याचा विषय आहे.
विष्णूच्या दहा अवतारांपैकी वामन, परशुराम, राम, कृष्ण हे चार अवतार नाटकांत दाखविले जातात. देव, दानवांचे युद्ध म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण असते. राक्षसांचा प्रवेश कधीकधी प्रेक्षकांच्या गर्दीतून होतो. त्यांचे ते भयानक रौद्ररूप, आरोळ्या, त्यांच्या हातातली लखलखणारी तलवार आणि त्यांच्या किंकाळ्यामुळे क्वचित मनात भीती निर्माण होते तसेच दशावतार बघायला मज्जाही येते. दशावतार नाटकाबद्दल सांगायचे झाल्यास हे लिखित स्वरूपाचे नसते. वेशभूषा करण्याच्या काही क्षण अगोदर कोणत्या कथेवर नाटक करायचे हे कलाकारांना सांगितले जाते. त्यानुसार प्रत्येक पात्र स्वतःचा संवाद तयार करतो. दशावतार रंगमंचावर सुरू होण्याआधी रंगमंचाच्या मागे गणपती आणि कलाकारांच्या साहित्याची पूजा केली जाते. रंगमंचावरील सादरीकरण स्वरूप हे वर्षांनुरूप चालत आलेल्या पद्धतीनेच केले जाते. पहिले गणपती स्तवन, पुर्वरंग, रिद्धी-सिद्धी, भटजी, संकासुर, सरस्वती, ब्रम्ह, विष्णू, महेश यांचे प्रवेश आणि उत्तरार्ध महाभारतातील पौराणिक कथा दाखवल्या जातात. या कथानकातील रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, संवादफेक, संगीत, कथानक, युद्धनृत्य सर्वांचे सादरीकरण आणि कलाकार यांचे कौशल्य अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक थंडीच्या दिवसांत रात्री १० ते पहाटेपर्यंत दशावतार बघत असतात.
नेटके खेळता दशावतारी,
तेथे येती सुंदरी नारी
नेत्र मोडीती कळकुसरी,
पडिते अवघे धटिंगण !!
हा समर्थ रामदासांचा दासबोधातील श्लोक. या श्लोकावरून समर्थ रामदासांचा देखील कोकणातील दशावतारी नाटकांबद्दल किती बारकाईने अभ्यास आहे हे जाणवते. प्रत्येक दशावतारी कलाकार आपल्या पात्राची तयारी, रंगभूषाही स्वतःच करतो. रांगभूषेसाठी खडूचे रंग वापरले जातात. देवतांच्या व्यक्तीरेखेसाठी निळा, पांढरा तसेच सौम्य रंग वापरले जातात. दशावतारी नाटक करणाऱ्यांचा मेकअप स्त्रियांनाही लाजवेल असा असतो. कोकणात दशावतारी नाटके मंदिरात किंवा मंदिराबाहेर असतात. दशावतार करताना मागे पडदा असतो किंवा मंदिराची भिंत पडद्याचे काम करते. रंगमंच म्हणजे दशावतारी कलाकारांसाठी तयार असलेले भरभक्कम लाकडी बाकडे होय. हीच तर खरी दशावतारी नाटकाची आणि त्यात काम करणाऱ्या नटवऱ्यांची खासियत असते. बाकड्याच्या डाव्या बाजूला पायपेटी, मृदंग, तबला, चक्की वाजवणारे असतात. पायपेटी वाजवणारा दशावतारी नाटक मंडळाचा ‘नायक’ असतो. त्याचे दशावतारी गायन म्हणजे दशावतारी नटाला ऐन वेळी केलेले दिग्दर्शन होय. नाटकाचे पुढील प्रवेश हे मृदंगाच्या थापेवर बदलत असतात. संपूर्ण दशावतारी नाटकांत पायपेटी, मृदंग आणि चक्की तीन वाद्ये प्राण ओततात. दशावतारी कलाकारांचे मालवणी बोलीभाषेतील बोलणे हे जमलेल्या रसिक प्रेक्षकांना रंगमंचाकडे आकर्षून घेते. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा दशावतार पाहण्यासाठी तल्लीन होतात.