सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनक्षेत्रात पाच वर्षांपूर्वी वाघांची नोंद शून्य होती. आता नव्या व्याघ्रगणनेत ती संख्या आठवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात जशी वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे, तशीच ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातही होत आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे प्रामुख्याने वास्तव्य जाणवत आहे. मात्र, येथील जंगलक्षेत्र हळूहळू नाहिसे झाले, तर भविष्यात माणूस आणि वन्य प्राणी यांच्यातील अंतर कमी व्हायला वेळ लागणार नाही.
दोडामार्ग तालुक्याच्या सीमेलगत, गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमा लागून असून, येथील जंगलक्षेत्रात वाघांचा मुक्त संचार वाढला आहे. येथील वनपरिक्षेत्रांतर्गत क्षेत्रात सोयी-सुविधांच्या अभाव असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत, तसेच वाघ पाण्यासाठी गावालगत येत असल्याने आता भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.
आंबोली ते दोडामार्ग सह्याद्री वनकॉरिडोअर असला, तरी येथील वृक्षतोडीला आळा घालणे तेवढेच गरजेचे असून, या परिसरात वाघाचे अस्तित्व हे सतत जाणवत आहे.
दोडामार्ग तालुक्यांतील राखीव वनात सोई-सुविधांचा अभाव असल्याची बाब पुढे आली आहे. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जंगलांचा विस्तार मोठा असून, गोवा-कर्नाटकच्या सीमा लागून आहेत. वाघांची संख्या वाढली असल्याने वनविभागाकडून कठोर अंमलबजावणीची गरज आहे. वाघांचे सध्या त्याचे ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, तेथे विपुल वनसंपदा आहे. पाणी आहे, तसेच शासनस्तरावर ही विविध उपाययोजना करण्यात येत असून, सह्याद्री वनकॉरिडोरमुळे जंगलक्षेत्र सुरक्षित राहण्यास आणखी मदत होणार आहे.