Tuesday, May 19, 2026

सिंधुदुर्गच्या समुद्रात अखेर विसावली युद्धनौका आयएनएस गुलदार; पर्यटकांना मिळणार अंडर वॉटर म्युझियमचा अनोखा अनुभव

सिंधुदुर्गच्या समुद्रात अखेर विसावली युद्धनौका आयएनएस गुलदार; पर्यटकांना मिळणार अंडर वॉटर म्युझियमचा अनोखा अनुभव

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रात आयएनएस गुलदार ही युद्धनौका अखेर संध्याकाळी पाच वाजता समुद्रतळाशी स्थिर करण्यात आली. गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत होते. विशेष प्रक्रियेनंतर ही युद्धनौका खोल समुद्रात सुरक्षितरीत्या विसावण्यात आली आहे. आता लवकरच पर्यटकांसाठी हा परिसर खुला करण्यात येणार असून पाणबुडी पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रातील अंडर वॉटर म्युझियमचा अनुभव घेता येणार आहे. निवतीच्या लाईट हाऊस परिसरात समुद्राच्या आत खोलवर ही युद्धनौका स्थिर करण्यात आली आहे. स्कूबा डायविंगच्या माध्यमातून पर्यटकांना नैसर्गिक प्रवाळे, विविध मत्स्यसंपदा आणि समुद्रातील ऐतिहासिक युद्धनौका पाहण्याची संधी मिळणार आहे.या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स परिसरात साकारत असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशातील सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण देणारा ठरणार आहे. भारतीय नौदलाची अभिमानास्पद युद्धनौका EX INS Guldar ही अनेक दशकांपासून देशसेवेत कार्यरत होती. सेवामुक्त झाल्यानंतर आता या युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील अद्वितीय पर्यटन केंद्रात करण्यात येत आहे. समुद्रतळाशी नियोजित पद्धतीने विसर्जित करण्यात येणारी ही युद्धनौका पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक संपदेचा शाश्वत विकास साधत पर्यटन क्षेत्राला नवे आयाम देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अंडरवॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्पामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. स्थानिक युवकांना रोजगार, पर्यटन व्यवसायाला गती आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्राखाली कृत्रिम प्रवाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी जीवसृष्टीला पोषक अधिवास उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. स्कूबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी जैवविविधतेचा अनोखा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता “अंडरवॉटर टुरिझम डेस्टिनेशन” म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. सागरी पर्यटन, साहसी पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा हा प्रकल्प राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठीही एक मैलाचा दगड ठरणार असल्याचेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.

Comments
Add Comment