शेत तलावाच्या जोरावर दयानंद पाटील यांची बहरली शेती
अलिबाग : पेण तालुक्यातील बहीरामकोटक येथील दयानंद पाटील या तरुणाने स्वत:च्या शेत तलावाच्या पाण्याच्या जोरावर उन्हाळी भातशेती प्रथमच यशस्वी करीत स्थानिक शेतकऱ्यांना बेरोजगारीवर कशी मात करायची हे दाखवून देत अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.
भात हे उष्ण कटिबंधातील पीक असून, त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीकवाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते. या पिकास सरासरी १००० मि.मी.पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते; परंतु या सर्व बाबींवर मात करीत पेण तालुक्यातील बहीरामकोटक येथील दयानंद पाटील या तरुणांने स्वत:च्या शेततलावाच्या पाण्याच्या जोरावर उन्हाळी भातशेती प्रथमच यशस्वी करुन येथील शेतकऱ्यांना बेरोजगारीवर मात कशी करायची हे दाखवून दिले.
दयानंद यांनी यावर्षी प्रथमच दुबार शेती पिकविली आहे. पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती बऱ्यापैकी सोपी आहे आणि चांगली येते. पावसाळी शेती करणे आताच्या काळात खूप कठीण आहे. कारण निसर्गाच्या अनियमित बदलांमुळे जून, जुलै महिन्यात पाऊस पडल्यास ठीक, अन्यथा शेतातील पिके करपून जातात, तरी पावसाचा पत्ता नसतो. त्यामुळे उन्हाळी शेती फायद्याची ठरते. खारेपाट भागातील जमीन चिकट असल्याने शेतीमधील पाणी काहीकाळ शेतात टिकून राहते. याचा फायदा घेत उन्हाळी शेती करण्याचे ठरवून ती योग्यरित्या पिकवून चांगल्याप्रकारे रोपे तयार झाले आहे. उन्हाळ्यात भात पिकवणारे बहुतेक प्रदेश नापीक असतात. भात पिकाचे तीन हंगाम आहेत: खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक. तांदूळ हे उष्णकटिबंधीय आणि खरीप पीक आहे ज्याला उष्णता, पाऊस आणि श्रम लागतात त्याला उबदार हवामान आवश्यक असते.