किल्ले रायगडावरील वाघ दरवाजाच्या जतन, संवर्धन कार्यास सुरुवात
महाड: मराठा कालखंडातील लष्करी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या वाघ दरवाजाचे जतन व संवर्धन कार्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती रायगड प्राधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली असून गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांच्या असलेल्या या मागणीची पूर्तता होणार असल्याने शिवभक्तांकडून आनंद व्यक्त होत आहे. या संदर्भात रायगड प्राधिकरणचे तज्ञ वरूण भामरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार रायगड प्राधिकरण करून आजपर्यंत गडावरील व गडा परिसरातील गावांच्या करण्यात आलेल्या संवर्धनाच्या कामानंतर आता चालू वर्षात महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी एक वाघ दरवाजाचे संवर्धन हे आहे असे स्पष्ट केले. यानंतर महादरवाजा नजीक हिरकणी बुरुज व परिसरातील बांधकामांचे जतन व संवर्धन करण्याच्या कामी बांधकाम विभागाकडून निधी मंजूर झाला असून प्राधान्याने भाग दरवाजाचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज रायगडावरील ज्या दरवाजातून निसटले, तो दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा असल्याचे स्पष्ट करून या दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती आवश्यक आहे. वाघ दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असून त्याचे जतन आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मान्यतेने रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आल्याचे नमूद केले. वाघ दरवाजा आणि त्याच्याशी जोडलेल्या तटबंदीचे दस्तऐवजीकरण केल्यानंतर जतन व संवर्धनाचे काम तीन टप्प्यांत सुरू करण्यात आले आहे.
मराठा साम्राज्याच्या अतिशय बिकट प्रसंगी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वाघ दरवाजाचे जतन व संवर्धन प्रगतीपथावर असल्याचे पाहून मनस्वी आनंद व समाधान वाटते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वाघ दरवाजाविषयी इतिहासात आढळून आलेल्या त्या संदर्भातील घटनांमुळे शिवभक्तांमध्ये त्याबद्दलची असलेली उत्सुकता व कुतूहल लक्षात घेऊन कामे गतीने व योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.