दहा दिवसांत कंत्राट संपणाऱ्या कंत्राटदारांचे काय?
वाडा : वाडा तालुका देशातील बहुतेक एकमेव तालुका असेल ज्यात एकही रस्ता खड्डेमुक्त नाही आणि याच गोष्टीची तालुक्यातील वाहन चालकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचे तालुक्यात मोठे जाळे पसरले आहे मात्र बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, तर अनेक मंजूर रस्ते अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत. एका नामांकित कंत्राटदाराच्या कामांचा यात विशेष समावेश असुन मुदत संपणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना काय कारवाई करणार असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे. खूपरी – देवगाव मार्गे अबिटघर या जवळपास ९ किमी अंतराचे काम डिसेंबर २०२३ या वर्षात एका नामांकित कंपनीला सोपविण्यात आले असून यासाठी तब्बल ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.
मुदत संपायची तारीख अवघ्या दहा दिवसांवर येऊनही बहुतांश काम अपूर्ण असून लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डाहे ते पीक या साडेपाच किमी मार्गाचे कंत्राट याचे कंपनीला देण्यात आले असून त्यासाठी तब्बल ५.३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. २० डिसेंबरला या कामाची मुदत संपत असूनही रस्त्याचे बहुतांश काम अपूर्णच आहे.
वाडा तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे मुदत संपूनही अपूर्णच असून जणू फलकावर मुदतीचा कालावधी लिहिणे ही एक औपचारिकता किंवा जनतेची मस्करी आहे असेच जाणवते. कंत्राटदार आपल्या हव्यासापोटी वाटेल तितकी कामे स्विकारतात मात्र मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही यंत्रणा कारवाई दिसत नाही. सरकारी गाफिलता कंत्राटदारांना खतपाणी घालते का असा सवाल लोकांनी उपस्थित केला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे करायचे काय असा प्रश्न लोकांना पडला आहे.
शाखा अभियंता विनोद घोलप यांना विचारणा केली असता अबिटघर – खुपरी मार्गाचे काम सुरळीत सुरु आहे तर डाहे ते पीक मार्गाचे काम आजपासून सुरू होईल असे ठरलेले उत्तर त्यांनी दिले.