कथा – रमेश तांबे
आपल्या दोन छोट्या मुलांना घेऊन एक आई बागेत आली होती. मुलं अगदी सारख्याच वयाची वाटत होती. बहुधा ती जुळीच असावीत. पण चेहरेपट्टीत बऱ्यापैकी फरक होता. संध्याकाळची वेळ होती. बागेत तुरळक गर्दी होती.
हमरस्त्यावरून गाड्यांची पळापळ सुरू होती. एका रिकाम्या सिमेंटच्या खुर्चीवर आई बसली अन् तिच्यासमोर तिची मुले खेळू लागली. तिने मुलांसाठी पाण्याची बाटली आणि खाऊचा डबासुद्धा आणला होता. दोन्ही मुले आता रंगात आली होती. हसत होती, खेळत होती, बागेतली माती अंगाला फासत होती, एकमेकांच्या मागे धावत होती, पायात पाय अडकून पडत होती, एकमेकांच्या उरावर बसत होती. हवं ते करण्याची जणू मुभा आईने मुलांना केव्हाच देऊन टाकली होती. त्यामुळे मुले मनसोक्त मजा करीत होती. आपल्या मुलांचा हा खेळ खुर्चीवर बसून आई कौतुकाने बघत होती. सर्वांगाला माती फसल्याने तिला तिची मुले भस्म फासलेल्या शंकरासारखी वाटू लागली. तेवढ्यात मुलांना तहान लागली. दोघेही घटाघटा पाणी प्यायले. सोबत आणलेल्या बिस्किटांवर ताव मारला. आईच्या पदराने दोघांनी तोंडे पुसली आणि पुन्हा खेळायला गेली. मघापासून आईच्या समोर धुडगूस घालणारी मुले आता थोडी लांब खेळायला गेली. खाली बसून बागेतली माती उकरण्याचे काम ती करू लागली. खेळाचा आनंद घेता घेता बराच वेळ निघून गेला. खेळता खेळता ती मुले अधूनमधून आईवर एखादा कटाक्ष टाकायची. आता आई त्या खुर्चीवर झोपली होती. मुलांनी तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा ती खेळण्यात मग्न झाली. सूर्य अस्ताला गेला. पाखरांचा चिवचिवाट शांत झाला. बागेतली गर्दीदेखील कमी झाली होती.
दोन-तीन खुर्च्यांवर वयस्कर माणसे गप्पा मारीत बसली होती. हमरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांच्या दिव्यांनी रस्ता उजळून निघाला होता. बागेतले दिवेसुद्धा हळूहळू मोठा प्रकाश फेकू लागले होते. अजूनही आई आपल्याला का बोलवत नाही म्हणून ती दोन्ही मुले आई जिथे झोपली होती तिथे आली. आई तर खुर्चीवर शांतपणे निजली होती. जवळ जाताच एका मुलाने हाक मारली, “आई चल उठ, घरी जाऊया!” मुलांनी परत हाक मारली, “जाऊया ना गं!” पण एक नाही दोन नाही. आई तशीच निजलेली शांतपणे! आई उठत नाही हे बघून मुले घाबरली अन् आईला मोठमोठ्याने हाका मारू लागली. “आई… आई… आई… उठ ना गं. चल ना गं… मला खूप भीती वाटते.” पण हूं नाही की चूं नाही. आई तर अशी झोपली होती की जणू तिला युगायुगांची झोप लागलीय…! आता मात्र मुलांचा संयम सुटला. मुलांनी प्रचंड टाहो फोडला. “आई…आई…” त्या विदीर्ण किंकाळ्यांनी आजूबाजूची मंडळी तिथे गोळा झाली. खरोखरच एक करूण दृश्य समोर दिसत होते. गाढ झोपलेल्या आईला तिची ती चिमुकली बाळं उठवत होती. दोघांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या. एक जण आईच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवत होता. तिचे पटापट मुके घेत होता आणि म्हणत होता, “आई उठ ना गं… आई उठ ना गं…!” त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची धार आईच्या गालावर टप टप पडत होती. त्या उष्ण, निरागस, कोवळ्या, भावनेने ओतप्रोत भरलेल्या आसवांच्या स्पर्शानेदेखील आईला जाग येत नव्हती. त्याचवेळी दुसरा मुलगा मात्र आईला थडाथड मारीत होता. तिला गदगदा हलवत होता. रडता रडता ओरडत होता. मुलांचा तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश साऱ्या बघ्यांच्या काळजाचं पाणी करत होता. बघ्यांनी हे जाणले होते की, मुलांची आई आता या जगात राहिली नाही. ती कशी कुणास ठाऊक पण मरण पावली होती. पण ती पाच-सहा वर्षांची चिमुकली बाळं. त्यांचा मित्र म्हणजे आई, त्यांचा देव म्हणजे आई, त्यांचे सर्वस्व म्हणजे आई, त्यांंचे सारे विश्व म्हणजे आई! बालकं अजाण होती. ती काय जाणणार मृत्यू म्हणजे काय ते! त्यांना कोण सांगणार…? अन् कसे सांगणार…!
सारा आसमंत त्या मुलांच्या आक्रोशाने व्यापूून गेला होता. अंगावर शहारे आणणाऱ्या, प्रत्येकाच्या काळजाच्या हजारो ठिकऱ्या उडवणाऱ्या त्या “आई… आई…” अशा किंकाळ्यांनी इंद्रसभादेखील डळमळू लागली. ब्रह्म, विष्णू, महेश हेदेखील त्या विलापासमोर नतमस्तक झाले.
मग बघ्यांपैकी दोघांनी मन खंबीर केले आणि त्या मुलांना उचलून कडेवर घेतले. आईच्या कलेवरापासून दूर नेले. “थांब हं बाळा आता उठेल आई. झोपलीय ना रे ती! किती त्रास देता तुम्ही तिला. ती दमली आहे ना म्हणून झोपलीय… गप… गप… रडू नकोस” तो तरुण त्या मुलांना समजत होता. पण स्वतः मात्र रडत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या. तेवढ्यात मुलांचे बाबा, आजी तिथे हजर झाले. मुले आजीला आणि बाबांना बिलगली. आई उठत नाही म्हणून आईची बाबांकडे तक्रार करू लागली. आजी-बाबा आल्यानंतर मुलांचा आक्रोश थांबला. दोन्ही मुले आता एकटक आईच्या निपचित पडलेल्या देेहाकडे शून्य नजरेने बघत होती. तो मृतदेेह तेथून हलवण्याचे काम लोकांनी सुरू केले. मुलांची आजी हमसून हमसून रडत होती. मुलांचे बाबादेखील एकसारखे रुमालाने डोळे पुसत होते आणि मुले मात्र आजी-बाबा का रडतायेत अशा प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. मुलांच्या बाबा आणि आजीवर भयाण संकट कोसळले होते. मुले मात्र त्या संकटापासून कित्येक मैल दूर… बाबा आणि आजीच्या कुशीत शांतपणे विसावली होती. कारण मृत्यू म्हणजे काय, हे समजण्याच्या पलीकडची ती होती… अगदी अजाण… निरागस… आणि निष्पाप…!