सुजय धुरत यांच्या वतीने भव्य-दिव्य २७ व्या ‘कोकण महोत्सवाचे’ आयोजन
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर भांडुपमध्ये मज्जा द्विगुणीत करण्यासाठी ‘कोकण महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ४ ते १५ डिसेंबर २०२४ या १२ दिवसांच्या कालावधीत कोकण महोत्सवाचे प्रमुख आयोजक व उद्योजक सुजय धुरत हे या महोत्सवाचे आयोजक असून भांडुप पश्चिम येथील कोकण नगरच्या अटलबिहारी वाजपेयी पटांगणावर हा कोकण महोत्सव रंगणार आहे.
यंदा या महोत्सवात कोकणातील १२० व्यावसायिक सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये विविध नामांकित नाटक मंडळींचे ‘दशावतारी’ प्रयोगासह सागोती, सुके बांगडे, सर्व प्रकारची मासळी, सरंगो, इसवन, पेडवे, मोरी, सुके पापलेट यांबरोबरच मालवणी खाज्या, कुरमुरे लाडू, खडखडे लाडू, उडीद, कुळथाची पिठी, कोकम रस, सुकी मच्छी, कोकणातील विविध मसाले, सोबत कोकणातील विविध शाकाहारी व मांसाहारी रुचकर खाद्य पदार्थांची मेजवाणी भांडुपकरांना मिळणार आहे. बुधवार ४ डिसेंबर ते रविवार १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत भांडुपकरांना महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे.
या महोत्सवामध्ये कोकणातील पारंपरिक खेळांबरोबर खेळ पैठणीचा, चित्रकला स्पर्धा, एकेरी व सामूहिक नृत्य स्पर्धा, लावणी स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदी सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक राजदत्त सुजय धुरत ९९८७१७३०३४ यांनी दिली.