अमरावती : विदर्भाच्या नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या (Melghat Tourism) विविध भागात सुरू असलेल्या जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगव्याचे दर्शन पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरले आहे.
Western Railway : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! आजपासून धावणार जादा एसी लोकल
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, बोरी, घारगड, वसाली, सिपना गुगामल व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान मेळघाटचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकास येथे व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने २० ऑक्टोबरपासून हत्ती सफारी सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात पर्यटक मेळघाटकडे आकर्षिले जात आहेत.
हत्ती सफारी खास आकर्षण
बच्चेकंपनीसाठी पर्वणी असलेली हत्ती सफारी खास आकर्षण ठरले आहे. चिखलदरा पर्यटनासह सेमाडोह येथे जंगल सफारीसाठी जिप्सी असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना व गुगामल वन्यजीव विभागांतर्गत असलेल्या वैराट, सेमाडोह, कुवापाटी आदी जंगलात हीजंगल सफारी पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. विविध वन्यप्राणी, पशु-पक्षी यांचे खास आकर्षण असले तरी मोठ्या प्रमाणात आता पर्यटकांना या प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे. घनदाट अरण्यात होणारी जंगल सफारी सुरू झाली. सफारीसाठी चार हत्ती तैनात आहेत.
मेळघाटच्या राजासह बिबटे, सांबराचे दर्शन
जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना हमखास वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, सांबर, हरिण, मोर तसेच विविध पक्षी-प्राण्यांचे दर्शन होत आहे. नरनाळा, शहानूर जंगल सफारी दरम्यान विविध प्राण्यांचे झालेले दर्शन पर्यटकांनी कथन केले. तसेच सेमाडोह जंगल सफारीतही विविध वन्य जिवांसह वाघाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.