मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास थोडाच कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे. मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास २०० जागांवर उमेदवार टाकले होते. यामध्ये अमित ठाकरे, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आदी अनेक मनसे नेत्यांना संधी देण्यात आली. यापैकी भाजपाने काही मतदारसंघात मनसेला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसेने शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना संधी दिली आहे. उद्या मतमोजणी असून तत्पुर्वी बाळा नांदगावकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महायुतीने बहुमत न मिळाल्यास प्लॅन बी देखील तयार केला असल्याचं समजून येतं आहे.
सागर बंगल्यावर विधानसभा निकालाआधीच घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते आहे. भाजपाचे अनेक मोठे नेते या बैठकीला हजर असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगांवकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. तर, मनसेचे बाळा नांदगावकर यांना देखील फडणवीसांची भेट घेतली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झाल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणाले, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाचं लग्न आहे. म्हणून ते सकाळी राज ठाकरेंकडे आले होते. राज ठाकरेंना त्यांनी पत्रिका दिल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांकडे पत्रिका द्यायला जात होते. ते म्हणाले की चला सोबत, म्हणून मी सुद्धा त्यांच्याबरोबर आलो. ते पुढे म्हणाले, “या भेटीदरम्यानमी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. तसंच, मला निवडणुकीत त्यांनी पाठिंबाही दिला होता, म्हणून मी त्यांचे आभार मानले.”
Adani Group : अदानी समूहाला पुन्हा धक्का ! केनियाकडून अदानींचे सर्व प्रकल्प रद्द
मनसे होणार किंगमेकर
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र मनसेने विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. तसेच मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. सध्या समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा किंगमेकर होण्याची शक्यता दिसून येत आहे.