पूर्णिमा शिंदे
दासबोध आणि मनाचे श्लोक या दोन्ही काव्यरचनांचा भक्ती हा पाया आहे. तिथे संवाद आणि संभाषण दोन्ही गोष्टी येतात आणि खूप काही शिकवून जातात. दासबोध हे गुरू-शिष्याचा संवाद आहे. एक प्रकट संवाद, तर दुसरा आंतरिक संवाद. लहानपणी शाळेमध्ये मनाचे श्लोक म्हणायच्या स्पर्धा व्हायच्या. त्या पाठांतर स्पर्धांमुळे मुलांच्या बालवयावर विद्यार्थी दशेमध्ये जे काही कोरलं जायचं ते आयुष्यभर लक्षात राहायचं. आमचाही काळ त्यातूनच गेलेला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून मनाचे श्लोक पाठांतराच्या स्पर्धा व्हायच्या. मुलांचे अगदी कोवळे वय, कोवळे मनावर मनाच्या श्लोकांचे संस्कार आणि त्यातून जडणघडण व्हायची. ती सुद्धा श्रवण, पठण आणि मनाचे श्लोक वाचल्यानंतर. त्यातील सोप्यात सोपा अर्थ समजून उमजून मुले वागायला लागतात. थेट हृदयाला जाऊन भिडणारे ते संवाद आपल्या मनाचा, चंचलतेचा झालेला उल्लेख एकूणच जीवनाचे, तत्त्वज्ञानाचे झालेले दर्शन माणसाच्या मनाला खंबीर वास्तव आणि दिशा देणार ठरते.
खेळ गड्यांच्या आठवणीत रंगलेलं बालपण आणि गृहपाठाचा विचार तितकाच मनात शालेय परिपाठ, शालेय ज्ञानसाधना, ग्रंथसंपदा, सांस्कृतिक स्पर्धा यातून आयुष्य मन जीवनाला वळण लावणारे मनाचे श्लोक म्हणजे अत्यंत आनंदाची पर्वणीच. मन एकाग्र करण्यासाठी नकळत्या वयामध्ये मनावर संस्कार घडवितात हे मनाचे श्लोक. समर्थ रामदासांनी एकूणच मनाचे व्यवस्थापन, जडणघडण आहे. लिखाणाचा प्रपंच जर पाहिला, तर मनाच्या जटिल तेच वर्णन आजपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञाला उमगले नाही. ते त्यांनी आणि संत कवयित्री बहिणाबाई या दोघांनी अतिशय सुंदर रूपामध्ये ते सादर केलेले आहे. मन कसे आहे? तर अचपळ! मन माझे नावरे आवरिता! तुजविण शीन होतो धाव रे धाव आता! अशी आर्तता, मनाची अपूर्वाई त्याची चंचलता ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतः अनुभवत असतो. पण ते अनुभवत असताना प्रत्येक श्लोकातील अर्थ आपल्या जीवनाशी निगडित वाटतो. जवळचा वाटतो, भारावून टाकतो म्हणून समर्थांनी केलेला मनाच्या श्लोकांची निर्मिती आहे ती मानवाच्या जीवनासाठी दीपस्तंभ आहे. भावपूर्ण काव्य आहे.
शक्ती, भक्ती, युक्ती देणारे काव्य आहे. त्याच्यामध्ये सोपी सहज ओघवती आणि जिव्हाळ्याची भाषा वाटते. पुढे पुढे जसे वाचत जावे तस तसे पाठ करावेसे वाटते. त्यात अभिरुची येते. म्हणून मनातील हळवे पण बाजूला ठेऊन त्या श्लोकामध्ये आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे. आपला देहभाव भक्ती-युक्तीने कसा श्रेष्ठ आहे! आपले तनमन हे मानव रुपी असून मानवाची मूल्य कोणती आहेत? ती जपली जावीत! त्याचे मनन, पठण, श्रवण व्हावे. आपली वाणी स्वच्छ, शुद्ध असावी ते पावित्र्य कसे येणार? तर चिंतन, वाचन, श्रवण याद्वारे. मनाचे सर्व दोष दूर व्हायला हवेत. म्हणूनच जो माणूस मनाने निर्मळ असतो तो शरीराने देखील निर्मळ असतो, तर हे मन निर्मळ होण्यासाठी मनाची मुक्तता होणे गरजेचे आहे. मग ते मनाच्या मुक्तीला लागणारा, लाभणारा सकारात्मक वसा, वारसा हा मनाचे श्लोक देतात. वर्षानुवर्षाची परिस्थिती किंवा प्रचिती या श्लोकातून येते. आजवर पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणे नव्याने पुन्हा जवळ बाळगावे किंवा अंतरिक सुख समाधानी आनंद अनुभूतीने माणूस परिपक्व, प्रगल्भ होतो.