राहुल गांधींकडून बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणून वदवून घेतील का?
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये असा पक्ष आहे ज्याने बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हाती आपल्या पक्षाचा रिमोट दिला आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरूवारी केली. राहुल गांधींकडून बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणून वदवून घेतील का?, असे आव्हान त्यांनी उबाठा सेनेला केले. राहुल गांधी हे ज्यादिवशी म्हणतील ना त्या दिवशी तुम्हाला चांगली झोप लागेल. रुग्णालयात जायची गरज लागणार नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांना हे लोक मिठ्या मारत आहेत असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या शिवाजी पार्क येथील जाहीर सभेला प्रंचड गर्दी होती. या विराट सभेला संबोधित करताना,आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची ही माझी शेवटची सभा आहे. मी या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण मी सगळ्या लोकांशी बोललो. आता मी आमच्या मुंबईत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीच्या बरोबर आहे. आज सगळीकडे एकच आवाज आहे भाजपा महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे.
राजकारणात एकमेकांवर पलटवार करणं समजू शकतो, पण प्रश्न जेव्हा देशाचा असतो तेव्हा प्रत्येक राजकारण्याचं कर्तव्य आहे की देश आपल्याही पेक्षा मोठा आहे हीच भूमिका प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. भाजपा महायुतीचा हाच विचार आहे. मात्र महाविकास आघाडीसाठी तसं नाही. त्यांच्यासाठी भारतापेक्षा मोठा त्यांचा पक्ष आहे. भारताच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे लोक आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा न देणारे लोक हेच आहेत. आम्ही जेव्हा मराठीला हा सन्मान दिला तेव्हा गप्प बसावं लागलं. महाविकास आघाडीचे हेतू काय ते नीट समजून घ्या. तुम्हाला सावध राहणार लागणार आहे. मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि महायुती स्वप्न खरी करणारी महायुती आहे. असंही नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे
महाराष्ट्र ही अशी भूमी आहे ज्या भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. याच महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी विचार दिले. आज महायुतीची विचारधारा एकीकडे आहे जी प्रगतीचा विचार करते. दुसरीकडे महाराष्ट्राचा अपमान करण्यचं काम महाविकास आघाडी करते आहे. महाविकास आघाडीचे लोक लांगुलचालनाचे गुलाम झाले आहेत. ही तीच आघाडी आहे जी राम मंदिराचा विरोध करते, भगवा दहशतवाद शब्द वापरते, वीर सावरकरांचा अपमान करणारी आघाडी आहे. काश्मीर मध्ये ३७० पुन्हा यावं म्हणून मंजुरी देणारे हे लोक आहेत. काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू करण्याला विरोध दर्शवत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मुंबईचा विकास काँग्रेसने मुळीच केला नाही
आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशकं काँग्रेसचं सरकार होतं तसंच महाराष्ट्रातही होतं. पण मुंबईसाठी यांनी कुठल्या प्रकल्पाची, योजनांची आखणीच केली नाही. काँग्रेसचं धोरण मुंबईच्या अगदी विरोधात आहे. मुंबई म्हणजे कष्ट, पुढे जाणं आणि प्रामाणिकपणा. पण काँग्रेसला फक्त भ्रष्टाचार येतो आणि विकासाच्या कामांमध्ये खोडा घालणं, यांनी मेट्रोला, अटल सेतूला विरोध दर्शवला होता. आम्ही युपीआय आणि डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं तेव्हा काँग्रेसवाले खिल्ली उडवायचे. अशा विचारधारेचे लोक मुंबईला पुढे नेऊ शकत नाही. मुंबई एकमेकांना जोडण्याचा विचार करते. मात्र काँग्रेस आणि त्यांची आघाडी विभाजन करते. या शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक हे जाती जातींमध्ये भांडणं लावत आहेत असा आरोप नरेंद्र मोदींनी (PM Modi) केला.