डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात सर्वच पक्षानी प्रचारात वेग घेतला आहे. नेते, उमेदवार आणि पदाधिकारी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दरमजल करीत आहेत. मनसेचे उमेदवार तथा आमदार राजू पाटील(Raju Patil) यांची भेटीगाठी प्रचाराची पहीली फेरी पूर्ण झाली असून आता ते चौकसभांवर भर देत आहेत. कल्याण ग्रामीण संपूर्ण मतदारक्षेत्र पाटील यांनी पिंजून काढले असून त्यांना ग्रामीण भागात पूर्ण सहकार्य मिळण्याचा विश्वास आहे. आमदार राजू पाटील यांनी केलेल्या कामावर मतदार खुष असल्याचे पदाधिकारी बोलत आहेत. तिरंगी लढत असली तरी राजू पाटील यांचे पारडे जड आहे अशी चर्चा कल्याण ग्रामीणमध्ये होत आहे.
राजू पाटील यांनी गोग्रासवाडी, पाथर्ली विभागात भेट देऊन तेथील नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाटील सांगत आहेत. दरम्यान, परिसरातील गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्रोत्सोव मंडळांकडून आमदार राजू पाटील यांच स्वागत करण्यात आलं. तसेच मतदारांकडून आ. राजू पाटील यांना विजयासाठी शुभेच्छाही मिळाल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांचा मतदार संघात झंझावाती प्रचार सुरू असून त्यांनी विरोधकांवर प्रचारात आघाडी घेतली असल्याची चर्चा आहे.
राजू पाटील प्रचार रॅलीच्या माध्यमातून दिवा विभागात प्रत्येक घराघरात पोहचत आहेत. संपूर्ण दिवा परिसरात प्रचार करण्यापूर्वी त्यांनी दिव्यातील गावदेवीच्या मंदिरात जाऊन गांवदेवीमातेचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर नगवाडी, क्रिश कॉलोनी, एन आर नगर, हनुमान मंदिर, प्रेम नगर, गणेश चौक, विनोद भगत, चेतन भगत, बंदर आळी, म्हात्रे आळी, दिवा चौक ते आमदार कार्यालय असा प्रचार करून लोकांचे आशिर्वाद घेतले. पाटील यांनी आणि त्यांच्या मनसे नेते-पदाधिकारी यांनी दुसऱ्या प्रचार फेरीत चौक सभा आणि जाहीर सभेच्या माध्यमातून मतदारसंघात घोडदौड सुरू केली आहे. प्रत्येक मतदाराला केलेल्या कामाची माहिती देऊन मनसेच्या राजू पाटील यांना आशीर्वाद द्या असा प्रचार करण्यावर भर असल्याचे मनसैनिक सांगत आहेत.
तिरंगी लढतीत राजू पाटील(Raju Patil) यांच्यासमोर शिवसेना (उद्धव गट) उमेदवार सुभाष भोईर आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राजेश मोरे यांचे कडवे आव्हान आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे 23 ताराखेच्या निकालानंतर समजून येणार असले तरी निवडणूक अटीतटीची असून प्रत्येक उमेदवारची प्रचार धुमाली जोरात आहे. विद्यमान आमदार राजू पाटील मैदान मारतील का अशीही चर्चा आहे.