आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षणाचा अंदाज
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या(Assembly election 2024) रणधुमाळीत यंदाच्या निवडणुकीतील निकालाचा अंदाज सांगणं चांगलंच कठीण बनलं आहे. मात्र, लाडकी बहीण योजना, योजनांचा पाऊस आणि सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास महायुतीचं पारडं जड वाटतं. त्यात आता आयएनएनएस माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्वेक्षणातून राज्यात कोणाचं सरकार येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्ये, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची चिन्हे दिसून येतात.
आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाच्या सर्वेक्षण अंदाजानुसार, राज्यातील २८८ मतदारसंघांचा विचार केल्यास राज्यात महायुतीचं पारडं जड दिसून येत आहेत. त्यानुसार, राज्यात १४५ ते १६५ जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला विजय मिळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, महायुतीचं पारड जड असून महायुतीचच सरकार पुन्हा येऊ शकतं,असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, राज्यात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता सर्वेक्षणातून दिसून येत आहे. तसेच, इतर राजकीय पक्ष किंवा अपक्षांना एकत्रित धरुन केवळ 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज दर्शविण्यात आला आहे. राजकीय सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी 23 नोव्हेंबर रोजीच अंतिम चित्र स्पष्ट होणार हेही तितकेच खरे.
या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील ७० पैकी ३१ ते ३८ जागांवर महायुतीला यश मिळू शकते. तर, महाविकास आघाडीला २९ ते ३२ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील ६२ जागांवरही महायुतीचं पारडं जड असून ३२ ते ३७ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला २१ ते २६ जागांवर यश मिळू शकते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या मराठवाड्यातही ४६ पैकी १८ ते २४ जागांवर महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असून येथे मविआला २० ते २४ जागा मिळू शकतात. ठाणे आणि कोकणातील ३९ जागांपैकी २३ ते २५ जागा महायुतीला मिळू शकतील. तर, १० ते ११ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल, असा अंदाज आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी २१ ते २६ जागांवर महायुती आणि १६ ते १९ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा सर्वेक्षणातून अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांपैकी १४ ते १६ जागांवर महायुतीला यश मिळेल, आणि १६ ते १९ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे, राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधून दिसून येते.
आयएनएस आणि मॅट्रीझ पोलच्या सर्वेक्षणातून विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2024) ४७ टक्के मतदान महायुतीच्या पारड्यात पडू शकते. तर, महाविकास आघाडीच्या पारड्यात ४१ टक्के मतदान पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांसाठी केवळ १२ee टक्के मतदानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१७५ पर्यंत जागा मिळवणे हा आमचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आले असता त्यांना या सर्व्हेबाबत विचारण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही राहिलेल्या दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे आणि 175 पर्यंत जागा मिळवणे हा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार?
महाविकास आघाडीत मुंबईत सर्वाधिक जागा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ५-९ च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ४-८ च्या दरम्यान जागा मिळू शकतात. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला ०-४ च्या दरम्यान जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समाजवादी पार्टीला ०-४ जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला मुंबईत ४१ टक्के मतं मिळू शकतात तर त्यांना १०-१३ दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज आयएएनएस आणि मॅट्रीझचा आहे. महायुतीमध्ये भाजपला १३-१७ दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज आयएएनएस आणि मॅट्रीझनं वर्तवला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत ७-११ च्या दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १-५ च्या दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला मुंबईत २१-२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला ४७ टक्के मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. मुंबईत मनसेला ०-४ दरम्यान जागा मिळू शकतात आणि इतरांना ०-४ जागा मिळू शकतात, असा अंदाज आयएएनएस आणि मॅट्रीझनं वर्तवला आहे.