मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. मुंबईतील माहीम मतदारसंघावर सध्या सर्वांचेच लक्ष लागलंय. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे आणि शिंदे विरुद्ध ठाकरे अशी तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. सध्या माहीम मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने चांगलाच संताप व्यक्त केला. निवडणुकांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना लाडक्या बहिणीच्या संतापाचा सामना करावा लागलाय. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून व्हिडिओत लाडकी बहीण चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळतंय.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सदा सरवणकर एका कोळी महिलेशी संवाद साधताना दिसत आहेत. यात ती कोळी महिला माहीममध्ये फिश फूड स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन सदा सरवणकरांना प्रश्न विचारत आहेत. मात्र विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न देता आल्याने ते माघारी परतल्याचे पाहायला मिळतंय. .
सदा सरवणकर आणि कोळी महिलेचा संवाद काय?
या व्हिडीओत सदा सरवणकर हे त्या कोळी महिलेच्या दारात जाऊन मतदान करण्यास सांगतात. त्यात ती महिला सरवणकरांना प्रश्न विचारते.
कोळी महिलेचा प्रश्न : आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला हे आधी सांगा. कधी चालू करणार?
सदा सर्वांकरांचं उत्तर : आम्ही लवकरच सुरु करु.
कोळी महिला : तुमच्या आम्ही हातापाया पडून झालं. आता आमच्या पोटावर आलं आहे. लाडकी बहीण बोलता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा आम्हाला?
सदा सरवणकर : आम्ही लवकरच सुरु करु, आपण घरात बसून यावर चर्चा करुया का?
कोळी महिलेचं सडेतोड उत्तर : घरात नको, तुम्ही बाहेरच राहा.
कोळी बांधव सदा सरवणकरांवर नाराज?
या व्हिडीओत असा संपूर्ण संवाद ऐकायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये ती कोळी महिला मोठ्या प्रमाणात संतापल्याच पाहायला मिळतंय. सदा सरवणकर हे तिचा संताप पाहिल्यावर काहीही न बोलता तिथून निघून गेल्याचंही दिसत आहेत. सदा सरवणकरांवर माहीम कोळीवाड्यातून अशाप्रकारे रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सदा सरवणकरांवर माहीमधील कोळी बांधव हे नाराज आहेत का? अशी चर्चा सध्या जोरात रंगली आहे. तसेच या नाराजीचा त्यांना फटका बसणार का? अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत.
याला म्हणतात जागृत मतदार..
मतदार नुसता सुशिक्षित असून चालत नाही तर तो ह्या ताईंसारखा सुज्ञदेखील असावा लागतो..
मत मागायला गेलेल्या सदा सरवणकर ह्यांना मतदारांनी अक्षरशः दारातून हाकलून लावले..
प्रश्न विचारायला शिका. मेंढरं होऊ नका. 🙏#mahimvidhansabha #SadaSarvankar pic.twitter.com/Pls8gK5iiT
— Sham Pawara (@ShamPawara09) November 11, 2024
दरम्यान, राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात रविवारी पुत्र अमित यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी, अमित यांच्या विरोधातील उमेदवारांना टीका करणार नसल्याचं म्हणत त्यांच्या इतिहासाची आठवण माहीमकरांना करुन दिली. काँग्रेसमधून हे शिवसेनेत आल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान, सदा सरवणकर यांच्यावर माहीम विधानसभा मतदारसंघात सध्या मनसेच्या (MNS) नेत्यांकडून अफाट टीका सुरू आहे.
अमितसाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज नसेल
आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं. तुमच्या हाकेला २४ तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असलं तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.