Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनया दिवाळीत ठेवा रक्तातील शर्करेवर नियंत्रण

या दिवाळीत ठेवा रक्तातील शर्करेवर नियंत्रण

अर्चना सोंडे

दिवाळी, दिव्यांचा सण, हा आनंदाचा, उत्सवाचा आणि स्वादिष्ट फराळांचा आनंद घेण्याचा काळ आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढणाऱ्या व्यक्तींसाठी हा सणाचा हंगाम थोडा आव्हानात्मक असू शकतो. तथापि, काही विचारपूर्वक नियोजन करून आपण आपल्या आरोग्याशी तडजोड न करता दिवाळीचा आनंद घेऊ शकता. या लेखात असावली पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीच्या प्रमुख डॉ. अपर्णा जयराम आपणांस दिवाळी दरम्यान रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे मार्गदर्शन करणार आहेत.

रक्तातील साखरेची उच्च पातळी नियंत्रित करण्यासाठी खालील उपाय करावेत-

१) रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमितपणे निरीक्षण करा : रक्तातील उच्च साखरेची पातळी व्यवस्थापित करण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांचे नियमितपणे निरीक्षण करणे. कोणते पदार्थ शरीरात गेल्यामुळे किंवा शारीरिक हालचालीमुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो हे समजून घेण्यास मदत करेल.
२) सक्रिय राहा : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली करा. फेरफटका मारा, योगाभ्यास करा किंवा तुम्हाला आवडेल अशा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा. हे केवळ तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीस हितकारक आहे. तसेच तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी देखील लाभदायक असेल.
३) योग्य कर्बोदकांचा आहारात समावेश करा : मैदायुक्त पदार्थापेक्षा भरडधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, मका इ.) असलेल्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्याचप्रमाणे रक्तप्रवाहात शर्करा तयार होण्याचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. फराळ तयार करण्यासाठी भरड धान्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
४) साखरयुक्त मिठाई वा फराळ कमी प्रमाणात खा : दिवाळीमध्ये मिठाई खाण्याचा मोह होत असला तरी, साखरयुक्त मिठाई मर्यादित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित असेल मिठाईचा लहान तुकडा तोंडात टाकण्यास काही हरकत नाही. काही साखर-मुक्त मिठाई देखील उपलब्ध आहेत. त्यांचा आस्वाद देखील घेता येईल.
५) फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा : फायबर रक्तात शर्करा विरघळण्याचे प्रमाण कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. तुमच्या जेवणात फळे, भाज्या, सुका मेवा आणि बिया यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
६) फराळाच्या सेवनावर नियंत्रण ठेवा : दिवाळीत अनेक नातेवाइकांच्या, मित्रांच्या घरी जाणे होते. त्यावेळेस फराळाचा आग्रह होणे स्वाभाविक आहे. मात्र अशावेळी फराळ मर्यादेत करा. वारंवार फराळ केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
७) भरपूर पाणी प्या : हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. योग्य हायड्रेशन संपूर्ण शारीरिक हालचालीस मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते.
८) मद्य सेवन मर्यादित करा : मद्य रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते म्हणून जर तुम्ही मद्य सेवन करायचे ठरवले तर ते कमी प्रमाणात करा. शुगर-फ्री मिक्सरमध्ये मिसळलेल्या ड्राय वाइन किंवा स्पिरीट्सची निवड करा.
रक्तातील साखरेची कमी पातळी नियंत्रित करण्यासाठी खालील उपाय करावेत.
९) गोड पदार्थ जवळ ठेवा : रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्तींनी ग्लुकोजच्या गोळ्या, फळांचा रस किंवा कँडीचा छोटा तुकडा यांसारखे गोड पदार्थ नेहमी सोबत ठेवावे. रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी झाल्यास ते पदार्थ तुमच्या रक्तातील साखरेची पातळी त्वरीत वाढवू शकतात.
१०) संतुलित आहार घ्या : कर्बोदक, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश असलेला आहार घेण्याचे लक्ष्य ठेवा. हे दिवसभर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते.
११) जेवण टाळू नका : जेवण टाळल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. नियमित आणि वेळेवर जेवण करावे. जास्त काळ उपाशी राहू नये.
१२) कमी ग्लायसेमिक इंडेक्स खाद्यपदार्थ निवडा : कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न हळूहळू शर्करा सोडतात. ज्यामुळे ऊर्जेचा अधिक शाश्वत स्रोत मिळतो. भरड धान्य, प्रथिने आणि उच्च फायबरयुक्त पदार्थांची निवड करा.
१३) कॅफिनचे सेवन मर्यादित करा : जास्त प्रमाणात कॅफिनमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. जर तुम्ही कॅफीनयुक्त पेये जसे की चहा, कॉफी यांचे सेवन करत असाल तर ते
संयमाने करा.

अशाप्रकारे रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवून ही दिवाळी आनंदाने साजरी करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -