Sunday, December 15, 2024
Homeसंपादकीयदिवाळीचा आनंद घ्या, पण प्रदूषण रोखा!

दिवाळीचा आनंद घ्या, पण प्रदूषण रोखा!

आपल्याकडे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर सर्वच जण सक्रिय झालेले दिसत आहेत. केरळच्या कासारगोडमध्ये मंगळवारी एका मोठ्या दुर्घटनेची बातमी कानावर आली आणि दिवाळीतील संभाव्य धोक्याकडे लक्ष देणे किती आवश्यक आहे, हे जाणवले. तेथील एका मंदिरात कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या साठ्यात स्फोट होऊन मंदिर परिसरात आग लागली. या भीषण दुर्घटनेत १५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हा एक भाग असताना, आगीच्या दुर्घटनेमुळे फक्त किंकाळ्या, आरडाओरड ऐकू येत नव्हता, तर आपला जीव वाचवण्यासाठी झालेली पळापळ आणि एकच हाहाकार हा दिवाळीच्या आनंदाला एक दु:खांची किनार देऊन गेला. केरळमधील हे उदाहरण ताजे असले तरी, दिवाळीच्या सणांमध्ये फटाक्यांमुळे अनेक दुर्घटना मुंबईसह महाराष्ट्रात यापूर्वी घडल्याचे अनेक प्रसंग आहेत. दुसरीकडे दिवाळी सणांच्या या आनंदमय वातावरणात देशभरातील अनेक शहरांनी प्रदूषणाची धोकादायक पातळी ओलांडली आहे, हेही विदारक चित्र डोळ्यांसमोर आहे. देशातील ११ शहरांची एक्यूआय म्हणजेच हवेच्या गुणवत्तेचा स्तर ३०० च्या वर नोंदवला गेला आहे. यात दिल्ली, नोएडा, मेरठ, गाझियाबाद, जयपूर, बुलंद शहर, अमृतसर, अलीगड, सोनीपत आणि फरिदाबाद या शहरांचा समावेश आहे. मुंबईवरही धुक्यांची चादर पसरली असून मरिन ड्राइव्हचा क्वीन्स नेकलेसही त्यात हरवला आहे. आग्य्राच्या ताजमहालालाही प्रदूषणामुळे धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण आणि धुक्यामुळे ताजमहाल अस्पष्ट दिसत आहे. दिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी जागोजागी पाणी फवारण्यात येत आहे, हे आजचे सत्य लपून राहिलेले नाही. प्रदूषण वाढल्यामुळे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे. शासन आदेशानुसार फटाके बनवणे, साठवणे, विक्री करणे आणि वापरणे यावर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर फटाक्यांच्या ऑनलाईन वितरणावरही बंदी आहे. या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना आपला अहवाल दररोज सादर करावा लागत आहे. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स ३००च्या वर गेल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआरमध्ये ग्रेप-१ लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कोळसा आणि सरपण वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सण-उत्सवात प्रदूषणात वाढ होणे, आता नवीन राहिलेले नाही. उच्च न्यायालयाकडून प्रशासनाला तंबी दिली जाते. वाढत्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने हस्तक्षेप करून, फटाके फोडण्याची वेळ ८ ते १० निश्चित केली. ‘प्रदूषण महामंडळ’, विविध स्वयंसेवी संस्थांकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून प्रदूषण वाढेल, असे कृत्य करू नका. सण-उत्सव साजरे करा, प्रदूषण वाढणार नाही यासाठी न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, सातत्याने करण्यात येत असलेल्या या आवाहनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे प्रमाण यावर्षीही कायम राहील का? हा संशोधनाचा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने न्यायालयाने आदेश देऊनही, त्या आदेशाचे उल्लंघन करण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. जनमानसातील उदासीन असलेला फार मोठा वर्ग या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून वातावरणात प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज काहीसा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात सध्या तरी काही नाही. गेल्या वर्षी मुंबईत मरिन ड्राईव्ह या उच्चभ्रूंच्या क्षेत्रात सर्वाधिक ११७ डेसिबल आवाजाची तीव्रता नोंदवली गेली होती. दक्षिण मुंबईसारख्या क्षेत्रात दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक आवाजाची तीव्रता नोंदवली गेली होती. वास्तविक या भागात राहणारी मंडळी अधिक सजग, विद्वान असतानाही याच भागाने आवाजाच्या प्रदूषणाची पातळी ओलांडली होती. त्या तुलनेत मुंबई उपनगर तसेच ठाणे, रायगड तसेच ग्रामीण महाराष्ट्रात फटाक्यांमुळे प्रदूषणामुळे किती वाढ होत असेल याचा विचार करायला हवा. शहरी भागात मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात येते. त्याचा परिणाम हवेची गुणवत्ता तसेच आवाजाचे प्रदूषण वाढण्यासही कारणीभूत ठरते.

देशातील प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असून, राजधानी दिल्लीची नोंद अलीकडेच जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंदवली गेली आहे. मुंबईसह अन्य महानगरांतही फारसे वेगळे चित्र नाही. रात्री १० वाजल्यानंतर अनेक शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. त्याच्या परिणामी हवेचा गुणवत्ता दर्जा आणखीनच खराब होण्यावर होतो. फटाक्यांमुळे विविध प्रकारची रसायने वातावरणात मिसळली गेली असून, त्याचा प्रभाव अनेक दिवस टिकून राहतो. नुकत्याच एका संशोधनात असे निदर्शनास आले आहे की, वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असतो. त्यात पशू-पक्ष्यांसह वनस्पतींवरही वातावरणात असलेल्या रसायनांचा प्रभाव दिसून येतो. रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे अनेक पशुपक्षी नामशेष झाले असून काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याची भयावहता प्रचंड आहे. यंदाच्या दिवाळीत आधीच वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला असताना, त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या अतिरेकाची भर पडू नये यासाठी नागरिकांनी सजग राहायला हवे. सण-उत्सव साजरे करताना नियमात व्हावे, आतिषबाजी जरूर करावी. मात्र पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मात्र आजवरची एकूण परिस्थिती पाहिली तर तसे होताना दिसत नाही, ही एक प्रकारे पर्यावरणाची फार मोठी हानी आहे, असे मानायला हरकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -