Tuesday, April 14, 2026

Navnath Ban : मविआ सरकारने कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यासाठी इंदू मिल स्मारकाचे काम रखडवले ?

Navnath Ban : मविआ सरकारने  कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यासाठी इंदू मिल स्मारकाचे काम रखडवले ?

मुंबई : “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष केवळ कंत्राटदारांकडून पैसे घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम थांबवण्याचे पाप केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या स्मारकाचे काम पूर्णपणे ठप्प ठेवल्यानेच स्मारकाच्या कामाला उशीर होत आहे”, असा आरोप भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी मंगळवारी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मांडली आणि डिसेंबर २०२६ पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा महायुती सरकारचा मानस असल्याचेही बन यांनी स्पष्ट केले.

प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बन यांनी सांगितले की, भोंदूबाबा अशोक खरातला मदत करण्याचे काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केले. मविआच्या काळात भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी दिले होते. तेव्हा संजय राऊत नाशिकचे संपर्कप्रमुख होते. भोंदूबाबा खरातबद्दल माहिती समोर येत असताना राऊतांच्या पोटात का दुखू लागले? उद्या कदाचित संजय राऊत यांच्याही फोनकॉलची माहिती समोर येईल. त्यामुळे ते आजपासून वातावरणनिर्मिती तयार करण्याचा प्रयत्न करताहेत, असे बन म्हणाले.

मुंबईतली खेळाची मैदाने ही विद्यार्थी, खेळाडूंसाठीच असतील, हेच या सरकारचे धोरण आहे. तिथे कुठल्याही बिल्डरांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. आणि बिल्डरांच्या गप्पा तुम्ही मारताय? कोविडकाळात कशा पद्धतीने बिल्डरांवर उधळपट्टी करण्याचे काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. कुठल्याही मैदानावर पंचतारांकित हॉटेल उभे केले जात नाही. संजय राऊत थोडीशी माहिती घ्या आणि मग बोला. विनाकारण अफवा पसरवण्याचे काम करू नका. कुठल्याही बिल्डरच्या घशात अशा पद्धतीने मैदान देता येत नाहीत हे थोडे तपासून घ्या. महाविकास आघाडी सरकार असताना बिल्डरांना रेड कार्पेट टाकायचे आणि बिल्डरांना मोठेमोठे मोक्याचे भूखंड देण्याचे काम तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केले होते. संजय राऊत, तुमची किती बिल्डरांसोबत भागीदारी आहे हे महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, असा इशाराही नवनाथ बन यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा