डॉ. सुकृत खांडेकर
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आल्यावर पक्षात मोठा उत्साह निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीसाठी जागा मिळवताना महाआघाडीत चांगली सौदेबाजी करता येईल, अशा भ्रमात काँग्रेसचे नेते वावरत होते. देशभरातून काँग्रेसचे शंभर खासदार निवडून आले पण महाराष्ट्रात महाआघाडीत एकेक जागा मिळवताना पक्षाच्या नेत्यांना नाकीनऊ आले. त्यातही आपल्या सग्यासोयऱ्यांना उमेदवारी देण्यातच नेते आग्रही राहिल्याने पक्षात असंतोष खदखदत आहे. ज्या उबाठा सेनेने काँग्रेसच्या विरोधात वर्षानुवर्षे निवडणूक लढवली, त्या पक्षाला बरोबर घेऊन निवडणूक लढविण्याची पाळी काँग्रेसवर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे अत्यंत संयमाने व कौशल्याने महाआघाडीची एकजूट कायम राहावी म्हणून प्रयत्न करीत असले तरी गेल्या महिनाभरात उबाठा सेनेचे पक्षप्रमुख, प्रवक्ते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात तू तू मै मै असे संघर्षाचे प्रसंग अनेकदा निर्माण झाले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनीही आपल्या पक्षाला मुंबईतून जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे दिसले नाही. उबाठा सेनेने परस्पर त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतरही नाना पटोले व वर्षा गायकवाड यांनी मिळमिळीत भूमिका घेतली. वर्षा गायकवाड यांनी त्यांची भगिनी डॉ. ज्योती यांनाच धारावीतून उमेदवारी मिळवून दिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपानंतर काँग्रेस पक्षात नाराजी व अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसचा जनाधार असलेल्या जागा उबाठा सेनेने घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये संताप आहे. मुंबईत काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठा आहे. सर्व जाती धर्मात व परप्रांतीय लोकांमध्ये काँग्रेसला जनाधार आहे. तरीही मुंबईतील ३६ मतदारसंघांतील केवळ ९ ते १० जागा काँग्रेसच्या वाट्याला येतात हाच काँग्रेसचा पराभव आहे. जागा वाटपाची चर्चा करताना पक्षाच्या दुबळ्या नेतृत्वाचा लाभ उबाठा सेनेने उठवला व काँग्रेसच्या पदरात मोजक्या जागांचे तुकडे टाकले. विधानसभा निवडणुकीला काँग्रेसला मुंबईत एक तृतियांश म्हणजे किमान १८ मतदारसंघ मिळायला हवे होते. पण उबाठा सेनेच्या सौदेबाजीपुढे काँग्रेस नेत्यांनी माना तुकावल्या, असे चित्र दिसले. दक्षिण सोलापूरच्या जागेवरून उबाठा सेनेने काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला, तेव्हा नाना पटोले यांनी उबाठाने आता जागा वाटपाचा विषय संपवावा असा सल्ला दिला. आपल्याला आपापसात नव्हे तर महायुतीच्या विरोधात लढायचे आहे. त्यामुळे उबाठा सेनेने महायुतीच्या विरोधात भूमिका मांडत राहावी असेही सांगितले. उबाठा सेनेने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये संताप व्यक्त झाला आहे. जिथे उबाठा सेनेचे उमेदवार जाहीर झाले आहेत, तेथे काँग्रेसने उमेदवार देण्याची गरज नाही असे उबाठा सेनेने म्हटले आहे. जागा वाटपाची बोलणी चालू असताना लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेने सांगली मतदारसंघात असाच परस्पर उमेदवार जाहीर केला होता, पण मतदारांनी उबाठा सेनेला चांगलाच धडा शिकवला व अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले काँग्रेसचे नेते व दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे दणदणीत मतांनी विजयी झाले होते.
सांगलीमध्ये तोंडावर आपटल्यानंतरही उबाठा सेना बोध घ्यायला तयार नाही. नाना पटोले म्हणतात, नागपूर विभागात एकच जागा मिळाली म्हणून उबाठा सेना नाराज असेल, तर ते कोणाचे वैयक्तिक मत असू शकेल. पण काँग्रेसला संपूर्ण कोकणात महाआघाडीच्या जागा वाटपात एकही जागा मिळाली नाही, मग आम्ही काय करायचे? लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेला मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळाली तशी विधानसभा निवडणुकीला मिळतीलच याची शाश्वती नाही. लोकसभेला भाजपा विरोधी वातावरणाचा लाभ उबाठा सेनेला मिळाला तसा आता विधानसभेला मिळण्याची शक्यता नाही. लोकसभेला काँग्रेसला मिळालेले यश विधानसभेला मिळेल काय, याचीही कोणी हमी देऊ शकत नाही. मुंबईतील वांद्रे पूर्व, भायखळा, वर्सोवा, कुलाबा या मतदारसंघांवर उबाठा सेनेने अगोदरपासून दावा केल्याने काँग्रेसची गोची झालेली दिसली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सेनेच्या ताकदीला तडा गेला आहे हे ठसविण्यात नाना पटोले व वर्षा गायकवाड कमी पडले. जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसला जास्तीत जास्त जागा खेचून आणता आल्या नाहीत. महाआघाडीत काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ आहे हे सांगण्यात पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले. मुंबईच्या जागा वाटपात काँग्रेसला कमी जागा मिळण्यास वर्षा गायकवाड, अस्लम शेख व अमिन पटेल हे त्रयी जबाबदार आहेत, असे पक्षात उघड आरोप केले जात आहेत. त्यांनी आपले हितसंबंध संभाळले पण पक्षाचे हित वाऱ्यावर सोडले. ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात मावळत्या विधानसभेत काँग्रेसचा आमदार (झिशान सिद्दिकी) होता. पण तोही मतदारसंघ उबाठाने अगोदरच काबीज केला व तेथे ठाकरे परिवारातील वरुण सरदेसाई यांची उमेदवारी घोषित करून टाकली. या मुद्द्यावरही काँग्रेस नेते मूग गिळून बसले. पश्चिम उपनगरातील गोरेगाव मतदारसंघात काँग्रेसला गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, पण तोही मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नाही. देशपातळीवर सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाला राज्यात शंभर जागा मिळवताना दमछाक झाली. राज्याच्या राजधानीत काँग्रेस पक्ष जेमतेम दहा जागा लढवणार असेल, तर त्यातील निवडून येणार किती? विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नंतर काँग्रेसचे भविष्य तरी काय असणार?
मुंबईत काँग्रेस पक्षाकडे ३६ मतदारसंघांसाठी ९०० इच्छुकांचे अर्ज आले होते. धारावी मतदारसंघासाठी २० इच्छुक होते. वर्सोवा मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुक काँग्रेसकडे होते. मुलुंड, कुलाबा किंवा बोरिवलीसाठी काँग्रेस किंवा उबाठा सेनेला उमेदवार ठरवता आला नाही. मुलुंडला भाजपाचे मिहीर कोटेजा हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी इशान्य मुंबईतून लोकसभा लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचाराला आले होते, तरी त्यांचा पराभव झाला. उबाठा सेना व काँग्रेसकडे मुलुंडमध्ये अनेक इच्छुक असूनही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला सोडली. मुलुंडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते हात चोळत बसले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी वांद्रे पूर्वमधून उमेदवारी मागितली पण पक्षाने त्यांचे नाव अंधेरी पश्चिममधून घोषित केले. पक्षात एक संयमी व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सचिन सावंत हे त्यांनी न मागितलेल्या मतदारसंघातून लढवतील तरी कसे? काँग्रेसला इशान्य मुंबईत एकाही मतदारसंघ वाट्याला आला नाही, म्हणून तेथील कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांतून काँग्रेस तर गायब आहे. तिथे एकही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली नाही. कोकणाने नानासाहेब कुंटे, बॅ. ए. आर. अंतुले, निशिकांत जोशी, हुसेन दलवाई, गोविंदराव निकम, ए. टी. पाटील असे अनेक नेते निवडून दिले. आता काँग्रेस कोकणात कुठे लढतीतच नाही… पुण्यातही जागा वाटपात पक्ष नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यामुळे पर्वती, शिवाजीनगर, कसबा या मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडाचे झेंडे फडकवले गेले आहेत. राज्यात भाजपाला आव्हान देणारा सर्वात मोठा पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा तयार होत असतानाच जागा वाटपात मोठा घाटा काँग्रेसच्या पदरी पडला आहे. काँग्रेसने राज्यात भाजपाप्रमाणेच किमान दीडशे जागा लढवायला हव्या होत्या, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे मत आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांच्यासारखे नेते जागा वाटपात का आग्रही राहिले नाहीत असा प्रश्न पक्षात विचारला जातो आहे. मित्रपक्षांनी जागा खेचून घेतल्या व नेते मात्र बघ्याची भूमिका घेत राहिले असे पक्षातून आरोप होत आहेत. यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतून काँग्रेसने १७ जागा लढवल्या व १३ जिंकल्या, उबाठा सेनेने २१ जागा लढल्या व ९ जिंकल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने १० जागा लढवल्या व ८ जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट ७०.५८ टक्के, उबाठा सेनेचा ४२.८५ टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चा ८० टक्के होता. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नंतर काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या खासदारांची संख्या १४ झाली. एकूण मतांमध्येही काँग्रेसची मते उबाठा सेनेपेक्षा जास्त होती. तरीही विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात काँग्रेसची फरफट झाली व पक्षात खदखद निर्माण झाली. दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी त्यांच्या काळात मुंबईत उभारलेली काँग्रेसची भक्कम पक्ष संघटना व प्रत्येक वॉर्डमध्ये निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे गेले कुठे? असा प्रश्न पक्षात विचारला जातो आहे.