Saturday, May 2, 2026

Indian Flag : पाण्याखाली फडकवला जगातील सर्वात मोठा भारतीय तिरंगा

Indian Flag : पाण्याखाली फडकवला जगातील सर्वात मोठा भारतीय तिरंगा

अंदमान - निकोबार बेटे : अंदमान आणि निकोबार बेटांनी शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. येथील स्वराज द्वीप (पूर्वीचे हॅवलॉक आयलंड) येथे समुद्राच्या पाण्याखाली भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकवून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे.

पाण्याखाली प्रदर्शित करण्यात आलेला हा विशाल तिरंगा ६० मीटर लांब आणि ४० मीटर रुंद होता. या मोहिमेत वन विभाग, मरीन पोलीस आणि खाजगी संस्थांमधील तज्ज्ञ पोहणाऱ्यांसह सुमारे २०० डायव्हर्सनी सहभाग घेतला होता. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा तिरंगा समुद्राच्या तळाशी फडकवण्यात आला.

विशेष म्हणजे, अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) देवेंद्र कुमार जोशी यांनी स्वतः डायव्हिंग टीमचा भाग बनून या मोहिमेत सहभाग नोंदवला.

अंदमानला जागतिक स्तरावर 'डायव्हिंग डेस्टिनेशन' म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हा प्रयत्न केला असल्याचे पर्यटन संचालक विनायक चमडिया यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे बेटावरील वैशिष्ट्यपूर्ण सागरी परिसंस्था, संवर्धन प्रयत्न आणि साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अंदमानच्या पर्यटनाला मोठी प्रसिद्धी मिळण्याची आणि जगभरातील डायव्हर्सना आकर्षित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील लक्ष्य : 'टॅलेस्ट ह्युमन स्टॅक'या विक्रमानंतर प्रशासन रविवारी आणखी एका विक्रमासाठी सज्ज झाले आहे. स्वराज द्वीप जेटीजवळील लाइट हाऊस परिसरात पाण्याखाली किमान १० मीटर उंचीचा 'सर्वात उंच मानवी मनोरा' उभारून दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >