उदय पिंगळे – मुंबई ग्राहक पंचायत
आर्थिक विषयाची किमान माहिती व्हावी म्हणून काही प्राथमिक संकल्पना आपल्याला माहिती असाव्यात असे वाटते. मागील दोन लेखांत आपण त्यापैकी मालमत्ता(अँसेट), वार्षिक अहवाल (अँन्युअल स्टेटमेंट), ताळेबंद (जमाखर्च), उच्च आर्थिक मूल्य असलेले समभाग (ब्लूचिप शेअर्स), रोखे (बॉण्ड), भांडवली नफा (कॅपिटल गेन), रोख प्रवाह (कॅश फ्लॉ), बाजारातील पत (क्रेडिट), घसारा निधी (डेप्रिसिएशन), समभाग(शेअर्स), प्रति समभाग कमाई(अर्निंग पर शेअर), प्रारंभिक भाग विक्री (इनिशियल पब्लिक ऑफर), आयकर विवरणपत्र (इनकम टॅक्स रिटर्न) या संकल्पना थोडक्यात माहिती करून घेतल्या. आता आणखी काही संकल्पना समजून घेऊयात.
१) देयता – देयता म्हणजे व्यवसायाने घेतलेले कर्ज अथवा इतरांकडून प्राप्त केलेले फायदे म्हणजे कंपनीने जे कर्ज घेतले आहे त्यावरील व्याज देणे, दिलेल्या मुदतीत त्याची परतफेड करणे. भांडवली गुंतवणूक करणाऱ्यांना त्याचा अंशतः मोबदला देणे ही तिची जबाबदारी आहे त्यास देयता असे म्हणतात. मालमत्ता आणि देयता यांची तुलना करून कंपनीची आर्थिक स्थिती कधी आहे याची सर्वसाधारण कल्पना येते. देयता म्हणजे देणे देण्याची जबाबदारी ही भवितव्याचा विचार करून निर्माण केली जाते. देणे देण्याच्या कालावधीवरून अल्पकालीन दायित्वे आणि दीर्घकालीन दायित्वे असे वर्गीकरण करता येईल. याशिवाय कधीकधी अचानकपणे खर्च करावा लागल्यास त्यास आकस्मिक दायित्व असे म्हणता येईल.
२) तरलता – बाजारभावावर फारसा प्रभाव न पडता ज्या ज्या मालमत्तेचे रोखीत सहज रूपांतर करता येते. त्या क्षमतेस तरलता असे म्हणता येईल. बाजार तरलता आणि लेखा तरलता असे तरलतेचे दोन प्रकार आहेत. देयतेपेक्षा मालमत्ता अधिक असणे आणि त्याचे त्वरित पैशात रूपांतर करता येण्याच्या क्षमतेवर कंपनीची सुदृढता अवलंबून असते. दीर्घकालीन कर्जे अशा कंपनीस सहज फेडता येतात.
३) बाजारमूल्य – एखाद्या कंपनीच्या बाजारात उपलब्ध शेअर्सना कंपनीच्या बाजारभावाने गुणले असता त्या कंपनीचे बाजारमूल्य समजते, त्यावरून तिचे मूल्यांकन करता येते. कंपनीची मोठ्या आकाराची लार्ज कॅप, मध्यम आकाराची मिड कॅप अथवा लहान आकाराची स्मॉल कॅप कंपनी अशी विभागणी करण्यास याची मदत होते. पूर्वी बाजारमूल्य मर्यादेवर अशी विभागणी केली जात असे आता नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य शोधून त्यांची क्रमवारी लावतात. सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या पहिल्या शंभर कंपन्या या मोठ्या कंपन्या समजतात. क्रमवारीतील एकशेएक ते दोनशे पन्नासपर्यंतच्या कंपन्या या मध्यम कंपन्या समजण्यात येतात तर इतर सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य कितीही असले तरी त्यांना छोट्या कंपन्या समजण्यात येते.
४) परस्पर निधी – विशिष्ट ध्येयाने अनेक लोकांची एकत्रितपणे गुंतवणूक करण्यासाठी निर्माण केलेला निधी. भांडवल बाजारात व्यक्ती म्हणून गुंतवणूक करताना अनेक मर्यादा येतात. यावर मात करून एकत्रित गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते. ही पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया असून यामुळे बचतीची सवय लागून थोडा संयम बाळगल्यास आकर्षक परतावा मिळू शकतो. थांबण्याची तयारी असेल तर निश्चित फायदा होतो. दीर्घकाळ थांबल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात या योजना आहेत. अगदी दरमहा पाचशे रुपये त्यात टाकून सुरुवात करू शकतो. त्यायोगे आपली सर्व स्वप्ने ही केवळ इच्छा न राहता लवकरच पूर्ण होऊ शकतात. शेअर्स, बॉण्ड, सोने-चांदी, इंडेक्स असे अनेक मालमत्ता प्रकार स्वतंत्रपणे अथवा मिश्रणात त्याच्याकडे उपलब्ध आहेत. ज्याची जी गरज त्यासाठी कोणती तरी योजना असे त्यांचे स्वरूप आहे. याबाबत पुरेशी जागरूकता निर्माण झाल्याने या योजनांत सातत्याने गुंतवणूक येत आहे.
५) सांपत्तिक स्थिती – व्यक्ती अथवा संस्था यांच्या एकूण मालमत्तेच्या किमतीतून देयता वजा केल्यास खरीखुरी सांपत्तिक स्थिती समजून येते. देयतेच्या तुलनेत मालमत्तेचे मूल्य अधिक असल्यास तुमची सांपत्तिक स्थिती उत्तम समजली जाते. मालमत्तेच्या तुलनेत देयता अधिक असल्यास आपण धोकादायक परिस्थितीत आहोत असे समजावे. राखीव फंड शिलकीत असल्यास त्यातून अधिक व्याजदराचे कर्ज प्रथम फेडावे. असा फंड नसेल तर मालमत्तेत वाढ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत.
६) गुंतवणुकीवरील परतावा – यावरून गुंतवणुकीचे मूल्यमापन करता येते. ते टक्केवारीत व्यक्त करतात. ही गणना सकारात्मक असेल तर आपली गुंतवणूक योग्य कार्य करीत आहे असे समजले जाते, तर नकारात्मक असेल तर त्याचा अर्थ असा होईल की, गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुमची अपेक्षित देयतेची जबाबदारी पूर्ण करण्यास कमी पडत आहे. असा परतावा काढण्यासाठी गुंतवणुकीतून मिळालेले निव्वळ उत्पन्न आणि गुंतवणूक रक्कम माहिती असणे गरजेचे आहे. ही गणना करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पैसे योग्य प्रकारे गुंतवले जात आहेत याचा अंदाज बांधणे. त्यानुसार गुंतवणुकीचे पुनरावलोकन करून आवश्यक त्यामध्ये योग्य ते बदल करणे.
७) अस्थिरता – आपण बाजारात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य हे प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा यातील फरकामुळे त्यात सातत्याने बदल होत असतो. याशिवाय सरकारी धोरण, भू-राजकीय परिस्थिती, सट्टेबाजी, अफवा यांसारख्या अनेक गोष्टींमुळे भाव कमी अधिक होत असतात. असे असले तरी कंपनीच्या कामगिरीवर ते कमी अधिक होतात अथवा स्थिरावतात. गुंतवणुकीमध्ये असलेल्या जोखमीमध्ये बाजारातील अस्थिरतेचा समावेश होतो. आर्थिक संकल्पना समजण्यासाठी थोडासा वेळ दिलात तर त्या सहज समजू शकतात. आपल्या आर्थिक सल्लागाराशी यासंबंधी नियमित चर्चा करीत राहा. या विषयावरील उत्तमोत्तम माहिती समाज माध्यमांवर आज उपलब्ध आहे. आपल्या आर्थिक जाणिवा समृद्ध होण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होईल. अलीकडेच एका खासगी कार्यक्रमात सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ केदार ओक यांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शनपर संदेश देताना चार “वा” लक्षात ठेवा असे सांगितले होते. ते चार “वा” पुढीलप्रमाणे –
१) वाचवा – आपले आर्थिक नुकसान टाळा
२) वाढवा – वाजवी नफा मिळवा
३) वापरा – मिळालेल्या पैशाचा सुयोग्य उपभोग घ्या
४) वाटा – सामाजिक जाणीव ठेवून गरजूंना मदतीचा हात पुढे करा.
या चारही वांची वाहवा करीत त्यांनी सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवूयात.