Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजक्रांती लढ्यातील राणी चेन्नम्मा

क्रांती लढ्यातील राणी चेन्नम्मा

– लता गुठे

१८५७ च्या क्रांतीलढाईतील उठावात शहीद झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याही आधी १८२४ मध्ये राणी चेन्नम्मा यांनी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध दिलेला लढा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला. या शूर राणीची ही कहाणी.

कित्तूरची राणी चेन्नम्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ साली कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील काकाती किल्ल्यावर झाला. लिंगायत सांप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील धुलाप्पा देसाई व पद्मावती देसाई हे चेन्नम्माचे आई-वडील. दिसायला सुंदर असलेल्या आपल्या मुलीचे नाव त्यांनी चेन्नम्मा ठेवले, कारण ती अतिशय तेजस्वी होती. चेन्नम्मा या शब्दाचा अर्थ सुंदर मुलगी असा होतो. तिचे शिक्षण राजकुळानुसार झाले. घोडेस्वारी, तलवारबाजी, अनेक शस्त्रास्त्रांचा सराव करणे, युद्धनीतीचे डावपेच हे सारे ती वडिलांकडून शिकली. चेन्नम्मा ही फक्त युद्धनीतीतच तरबेज नव्हती, तर तिला कन्नड, उर्दू, मराठी व संस्कृत या चारही भाषा अवगत होत्या. चेन्नम्माचे बालपण सुसंस्कृत आणि अतिशय संपन्न अशा राजघराण्यात गेले. या शूर मुलीचा तिच्या आई-बाबांना अभिमान वाटत असे. राजघराण्यातील मुलाप्रमाणे तिचे संगोपन झाले. दिसायला सुंदर आणि अनेक भाषा अवगत असलेली राजकुमारी चेन्नम्मा यांना शिकारीचाही छंद होता.

एक दिवस पंधरा वर्षांची चेन्नम्मा शिकारीला गेली असताना जंगलात तिला एक वाघ दिसला, त्यावर तिने निशाणा धरून बाण मारला. त्याचवेळेला दुसरा एक बाण येऊन त्या वाघाच्या शरीरात घुसला. तो बाण होता कित्तूरचा राजकुमार मल्लासारजा यांचा. राजकुमार मल्लसारजा यांना आश्चर्य वाटले की, मी एकच बाण मारला पण हा दुसरा बाण मारणारी व्यक्ती कोण असेल? विचार करत असतानाच राजकुमारी चेन्नम्मा समोर दिसली. तिची शूरता, करारीपणा आणि सौंदर्य पाहून राजकुमाराला तिचे आकर्षण निर्माण झाले. आणि काही महिन्यातच त्यांचा विवाह कित्तूरचा राजा मल्लसारजा यांच्याशी झाला.

कर्नाटक  राज्याच्या  शिमोगा  जिल्ह्यातील केळदी या संस्थानाच्या चेन्नम्मा राणी झाल्या. मल्लासारजा हा प्रजावत्सल, न्यायी, कलाप्रेमी राजा होता. कित्तूर हे संपूर्ण हिंदुस्थानात हिरे, रत्ने याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. इ. स. १७९३ मध्ये चेन्नम्माचे लग्न मल्लासारजा नायक राजाशी झाले आणि चेनम्मा पट्टराणी झाली. चेन्नम्मा ही सर्वगुणसंपन्न असल्यामुळे तिच्यातील प्रजावत्सलता, शौर्य, वर्तनातील ऋजुता यामुळे ती राजपरिवारात आणि प्रजेतही अल्पकाळातच लोकप्रिय झाली. काही काळातच राजघराण्याला राणीने वारसा दिला. ती एका मुलाची आई झाली.
त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली आणि नियतीने घाव घातला. लग्नानंतर दहा वर्षांनी इ.स. १८०३ मध्ये विरोधी सरदारांनी मल्लासारजा नायक याचा खून केला, पण त्यांना राज्य ताब्यात घेणे जमले नाही. अतिशय बुद्धीमानी असलेली राणी चेन्नम्मा सत्तेवर आली. सत्तेवर येताच तिने विरोधी सरदारांचा बंदोबस्त केला. काही स्थानिक मांडलिक राजे वेगळे राज्य स्थापन करण्याच्या बेतात होते, त्यांचाही चेन्नम्माने बंदोबस्त केला. एका मुलाची आणि राज्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. या आघातातून त्या कशाबशा सावरल्या तोच पुन्हा दुसरा आघात झाला. त्यांचा एकुलता एक मुलगाही नियतीने त्यांच्यापासून दूर केला. छोट्याशा सुकुमार राणीला सगळीकडे काळोख दिसू लागला; परंतु कर्तव्यदक्ष राणीने विचार केला की, प्रजेला माझी जास्त गरज आहे त्यांच्यासाठी मला जगले पाहिजे. या विचाराने त्यांच्या मनाला पुन्हा उभारी आली. आणि राज्यकारभाराचे सूत्र त्यांनी हाती घेतले. राणीला मूलबाळ नव्हते. तिने आपल्या जवळच्या नात्यातील शिवलिंगप्पा नावाच्या मुलाला दत्तक घेतले. आणि आपल्या गादीचे वारस घोषित केले; परंतु इंग्रजांच्या हडक नीतीकडे राणीने दुर्लक्ष केले. या कारणावरून राणी चेन्नम्मा त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी इंग्रजांनी खूप प्रयत्न केले; परंतु शूर राणी मोठ्या हिमतीने सामोरे गेली. त्यांनी स्रियांची मोठी फौज उभी केली. महिलांना ब्रिटीश राजवटीविरुद्ध उठाव करण्यास प्रवृत्त केले.

त्या काळात इंग्रजी राजवटीतील लॅप्सचा कायदा असा होता की, ज्या राजघराण्यामध्ये स्वतःचे मूल नसल्यास त्यांना मूल दत्तक घेण्याची परवानगी नाही त्यांचा प्रदेश आपोआप ब्रिटीश साम्राज्याचा भाग बनेल. यानुसार कित्तूरचे राज्य धारवाडचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्या प्रभारी प्रशासनाखाली आले. त्या काळात श्री चॅप्लिन हे या प्रदेशाचे आयुक्त होते. ब्रिटिशांनी कित्तूरला ब्रिटिश राजवट स्वीकारायला भाग पाडले.

राणी चेन्नम्मा आणि स्थानिक लोकांनी ब्रिटीशांच्या उच्चाधिकारशाहीला जोरदार विरोध केला. त्याकाळी जिल्हाधिकारी असलेल्या ठाकरेंनी कित्तूरवर स्वारी केली. त्यानंतर झालेल्या युद्धात ठाकरेंसह शेकडो ब्रिटिश सैनिक मारले गेले. हा पराभव इंग्रजांना सहन झाला नाही. त्यांनी म्हैसूर आणि सोलापूर येथून मोठे सैन्य आणले आणि कित्तूरला वेढा घातला. राणी चेन्नम्माने युद्ध टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वेढा उठविण्यासाठी चॅप्लिन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर यांच्याशी वाटाघाटी केल्या. इतकेच नाही, तर राणी चेन्नम्माने बॉम्बे प्रेसिडेन्सीचे लेफ्टनंट-गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना अनेक पत्रे पाठवून साम्राज्यासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु ती नाकारण्यात आली. परिणामी युद्ध झाले. ऑक्टोबर १८२४ मध्ये, ब्रिटिश सैन्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांना माघार घ्यावी लागली, परिणामी राणी चेन्नम्माचा विजय झाला. युद्धाच्या या पहिल्या फेरीत, सेंट जॉन ठाकरे राणीचे लेफ्टनंट, अमातूर बाळाप्पा कारवाईत मारले गेले. राणी चेन्नम्मा यांनी दोन ब्रिटीश अधिकारी, मिस्टर स्टीव्हनसन आणि सर वॉल्टर इलियट यांना युद्धकैदी म्हणून पकडले पण नंतर चॅप्लिनसोबतच्या कराराचा एक भाग म्हणून त्यांना सोडून दिले. याचा अर्थ युद्ध संपुष्टात आले. तथापि, चॅप्लिनने युद्ध संपवले नाही आणि जोरदार सैन्य पाठवले. त्याचा फारसा परिणाम झाला नाही. नाईलाजाणे चेन्नम्माला युद्धाची घोषणा करणे भाग पडले. १२ दिवस, या शूर राणीने आणि तिच्या सैनिकांनी त्यांच्या गडाचे रक्षण केले; परंतु स्वार्थी प्रवृत्तीच्या काही त्यांच्याच लोकांनी घात केला. ते देशद्रोही आत घुसले आणि तोफांमधून गोळाबार करून राणीचा पराभव केला. ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या या दुसऱ्या लढाईत दुर्दैवाने, राणी आणि तिच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा सैन्यातील देशद्रोह्यांनी विश्वासघात केला. ज्यांनी बंदुकीत शेण मिसळले आणि शस्त्रे निरुपयोगी केली. १८२४ ला चेन्नामा राणीला कैद करून बैलहोंगलच्या किल्ल्यात डांबून ठेवले. त्यानंतरचे दिवस त्यांनी पवित्र ग्रंथ वाचण्यात आणि पूजापाठ करण्यात घालवले. या शूर पराक्रमी राणी चेन्नम्माचा २ फेब्रुवारी १८२९ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी ब्रिटीशांच्या ताब्यात मृत्यू झाला.

कित्तूरची राणी चेन्नम्मा यांनी इतिहासात आपल्या नावाचे तेजस्वी पान लिहिले. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे. या लढाऊ राणीची अमर कथा सदैव स्मरणात राहावी यासाठी ११ सप्टेंबर २००७ रोजी कित्तूरची राणी चेन्नम्माचा पुतळा नवी दिल्ली येथील संसदीय इमारतीच्या आवारात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते तिच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अशा या शूर, पराक्रमी असामान्य कित्तूरच्या राणीला सलाम…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -