नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड
विश्वकोशाची अध्यक्ष झाले तेव्हा काहींनी मजवर टीका केली. पण माधवी कुंटे, स्नेहलता देशमुख या दोघींनी मजवर विश्वास दाखवला. आता दोघी बाप्पाकडे गेल्या आहेत. डॉ. स्नेहलता देशमुख मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या आणि माधवी कुंटे ही नामवंत लेखिका होती. माधवीचे जाणे काळजाला चटका लावून गेले. स्नेहलताबाईनी मला पोरके केले.
निशिगंधाने मजपासून माधवीचे जाणे लपवून ठेवले होते. खरे तर मावशी (मी) भाचीचे (माधवी) आमचे नाते. तरी पण ती मला विजयाताईच म्हणे. सार्वजनिक ठिकाणी अहो, जाहो करी. माझे फार प्रेम होते माधवीवर! म्हणून ही गुप्तता! कथा तर अशा बांधीव आणि कलात्मक सादर करी, की वाचता वाचता काळजात घर करावे. आमचे प्रकाशक एक होते. अशोक मुळे आणि कौतुक मुळे यांचे डिंपल प्रकाशन आणि शरद मराठे यांचे नवचैतन्य प्रकाशन. सुंदर सुंदर पुस्तके दोघे काढत. इतका आनंद होई ना ! माधवीची धाकटी बहीण उमा ! तिला माझ्या आईचा खूप लळा होता. पण उमा लवकर हे जग सोडून गेली. चटका लावून गेली. माधवीचा स्वभाव अत्यंत ऋजू! कधी कुणाला टोचून बोलेल हे स्वभावातच नाही. ‘निके बरवे, ते शोधावे उणेपण सोडून द्यावे...
चांगल्याची पाठ धरावी अन् कौतुकाची थाप द्यावी!’ ही वृत्ती. त्यामुळे मित्रपरिवार अमाप होता. मी विश्वकोशाची अध्यक्षा झाले, तेव्हा उघडपणे मला पाठिंबा या दोघींनी दिला. माझ्या संकटमोचक हनुमान झाल्या दोघी, माधवी आणि स्नेहलताबाई! “माधवी गेली, हे मला का बरं सांगितलं नाहीस?” मी व्यथित होऊन मुलीला विचारलं, “कारण तुझ्या जीवाला त्रास झाला असता” तिने उत्तर दिले. शरद मराठे या प्रकाशकांना तेच विचारलं.
त्यांनी तेच उत्तर दिलं. “तुमच्या मनास त्रास झाला असता.” “अरे झाला असता त्रास ! रडून घेतलं असतं मी! पण ही लपवाछपवी मला सहन होत नाही.” माधवी, मला आता चालताना त्रास होतो. वॉकर घ्यावा लागतो. बाप्पाकडे बिना वॉकरची कशी जाईन? मला वाटते, तो अलगद मला हातावर उचलून नेईल. माधवीला अनेक पुरस्कार मिळाले. तिची पुरस्कारांनी सुशोभित खोली मी बघितली आहे. पार्ले येथे तिचे मोठ्ठे घर होते-आहे. घरे-दारे अबाधित राहतात. खरं ना! माणसे मात्र उठून जातात. जीवाला चटका लावून!
दिवाळी अंकात तिच्या कथा बांधीव, रेखीव, ठाशीव असत. बोलणेही इतके ऋजू की, कोणाला कानात मधुर घंटा किणकिणावी असे मनास सुख होई. आता दिवाळी अंक पोरके झाले.
मला आठवते, शरद मराठे यांनी ७५व्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ केला होता. माधवीला किती आनंद झाला होता. पण माझा पाय मोडला होता. त्यामुळे मी समारंभाला प्रमुख पाहुणी म्हणून जाऊ शकले नाही. दुसऱ्या एका प्रसिद्ध लेखिकेने पुण्याहून येऊन ते प्रकाशन केले. तिच्या कथांमध्ये माणसाच्या सुखदुःखाचे फार खरे वर्णन असते अशी ही पारदर्शी लेखणी! खरे तर मी तिची मावशी! मामे मावशी! पण मला ती विजयाताईच म्हणे, अत्यंत प्रेमाने हाक मारी! तिच्या पार्ल्याच्या घरी मी किती वेळा गेले, त्याचा हिशोब नाही. दरवेळी प्रेमाने स्वागत होई. चहा, डोसा, इडली यांचा आग्रह होई. तेही ताजे ताजे नि गरम गरम ! स्नेहलताबाई म्हणजे माझा आधारस्तंभ होत्या. मला विरोध होत असताना ठामपणे प्रसारमाध्यमांना बजावत होत्या. “विजयाबाई मराठी विश्वकोशाचे काम उतमरीत्या पूर्ण करतील असा मला विश्वास वाटतो आणि ते काम मज हातून पूर्ण झाले. तेव्हा एकच शब्द बोलल्या. कोणती होती ती शाबासकी? सांगू? ‘जिंकलीस’
सीएम साहेबांनी हौसेने प्रकाशन केले, त्यास त्या जातीने हजर होत्या. त्या आणि रिमा लागू ही अभिनेत्री. सारे विश्वकोश मंडळ तर हजर होतेच ! अशा मधुर आठवणी. पण माधवी कुंटे गेली हे मनाला सहन होत नाहीये. मैत्रिणी, तू अर्ध्यावरती सोडून गेलीस दुनिया तुझ्या वाचुनी असे वाटते, जीवन हे वाया ! तुझे प्रेम अन् माया आठवे, मनास जाच होई, सत मैत्रीची, स्त प्रीतीची आठवण मोठी होई ! अक्षरं अक्षर जोडीत केला सारा लेखनप्रवास वाचकांना सुख देणे हा वृतीचा तव ध्यास ! पुस्तकांचा केलास तू, जीवनभर गं प्रवास, वाचकांना आठवणींचा सुंदर केला खास ! तुझे प्रेम अन् तुझीच माया, पांघरली मी अंगावरती ! प्रीत तुझी गं सखे लाडके, अनावर होती.






