Sunday, April 26, 2026

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच बुधवार २९ आणि गुरुवार ३० एप्रिल असा दोन दिवसांचा उत्तर प्रदेशचा दौरा जाहीर झाला आहे. या दोन्ही सरकारी दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदी विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ आणि २८ एप्रिल रोजी सिक्कीमचा दौरा करणार असून, या दौऱ्यात ते राज्याच्या ५० व्या राज्यत्व वर्ष सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहतील आणि ४,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण व पायाभरणी करतील. नियोजनानुसार २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते गंगटोकला पोहोचतील. नंतर २८ एप्रिलच्या सकाळी, पंतप्रधान गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट देतील, जिथे राज्याचा जैविक आणि वनस्पती वारसा प्रदर्शित करण्यासाठी अत्याधुनिक 'स्वर्णजयंती मैत्री मंजरी पार्क' विकसित करण्यात आले आहे. त्यानंतर पंतप्रधान गंगटोक येथील पालजोर स्टेडियममध्ये ५० व्या राज्य स्थापना वर्ष सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. याप्रसंगी, ते राज्यभरातील ४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. हे प्रकल्प पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, पर्यावरण, पर्यटन आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांना चालना देतील. त्यानंतर पंतप्रधान नामची जिल्ह्यातील यांगंग येथे १०० खाटांच्या आयुर्वेदिक रुग्णालयाची पायाभरणी करतील. ते एनआयटी देवराली येथे ३० खाटांच्या एकात्मिक सोवा-रिग्पा रुग्णालयाचेही उद्घाटन करतील, जे पारंपरिक वैद्यकीय सेवांना प्रोत्साहन देईल.

पंतप्रधान सिक्कीम विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे, नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्सच्या प्रशासकीय इमारतीचे, हेलन लेपचा मेडिकल कॉलेजचे आणि डेंटम प्रोफेशनल कॉलेजचे उद्घाटन करतील. ते आदर्श निवासी शाळा, एक नवीन पदवी महाविद्यालय आणि एका मठवासी वसतिगृह-सह-वर्गखोलीचेही उद्घाटन करतील. राज्यभरातील १६० शाळांमध्ये आयटी-आधारित शैक्षणिक पायाभूत सुविधाही सुरू केल्या जातील. संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान तीस्ता नदीवरील दोन दुहेरी लेनच्या स्टील आर्च पुलांची पायाभरणी करतील आणि बिरधांग ते नामची पर्यंतच्या रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करतील. ऊर्जा क्षेत्रात, गंगटोकमधील पारेषण आणि वितरण नेटवर्कच्या आधुनिकीकरणाचे उद्घाटन केले जाईल, ज्यामुळे अधिक विश्वसनीय वीजपुरवठा सुनिश्चित होईल. शहरी विकासांतर्गत, लुम्से येथील लोकसेवा सचिवालय, गंगटोक येथील नागरी सेवा अधिकारी संस्था आणि विविध गृहनिर्माण प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. एम.जी. मार्गावरील सद्भाव पॅव्हेलियनची पायाभरणीही केली जाईल.

पर्यावरण संरक्षणांतर्गत, सिंगताममधील सांडपाणी व्यवस्थेचा पुनर्विकास आणि गंगटोकमधील राणी चू नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचे उद्घाटन केले जाईल. पर्यटन क्षेत्रात, रिज प्रिसींक्टचा पुनर्विकास, सोरेंग येथील पर्यावरणपूरक पर्यटन आणि तीर्थयात्रा पायाभूत सुविधा, कैलास मानसरोवर यात्रेसंबंधित सुविधा आणि यात्रेकरूंच्या निवासस्थानांचे उद्घाटन केले जाईल. ग्यालशिंग येथील पर्यावरणपूरक तीर्थयात्रा संकुलाची पायाभरणीही केली जाईल. याव्यतिरिक्त, पंतप्रधान सिक्कीम इफ्को प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करतील, ज्यामुळे कृषी प्रक्रिया आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्याच वेळी, पाकयोंग जिल्ह्यात इनडोअर क्रिकेट सुविधेचेही उद्घाटन केले जाईल.

पंतप्रधान मोदी २८ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता महिला संमेलनामध्ये सहभागी होतील. येथे ते वाराणसीमधील सुमारे ६३५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. नंतर २९ एप्रिल रोजी सकाळी साधारण साडेआठ वाजता, पंतप्रधान वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर, पंतप्रधान हरदोईला प्रयाण करतील आणि सकाळी साधारण साडेअकरा वाजता गंगा एक्सप्रेसवे या दृतगती मार्गाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

वाराणसीमध्ये पंतप्रधान महिला संमेलनामध्ये सहभागी होणार असून संपूर्ण परिसरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतील. पंतप्रधान १०५० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ४८ पूर्ण झालेले प्रकल्प देशाला समर्पित करतील. मुख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये, वाराणसी-आझमगड रस्ता रुंदीकरणाचे पूर्ण झालेले काम, कज्जाकपुरा आणि कादीपूर येथील महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि भगवानपूर येथील ५५ एम एल डी (दररोज दशलक्ष लिटर) क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एस टी पी) उद्घाटन, यांचा समावेश आहे.

पंतप्रधान समाजाभिमुख अशा विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ३० ग्रामीण पेयजल योजना, चंद्रावती घाटाचा पुनर्विकास, सारनाथ जवळील सारंगनाथ मंदिराचा पर्यटन विकास आणि संत रविदास पार्क, नगवा येथील सुशोभीकरण आणि नूतनीकरणाच्या कामांचा समावेश आहे.

सार्वजनिक सेवा आणि क्रीडा क्षेत्रातील विकासालाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यात उत्तर प्रदेश महाविद्यालयातील सिंथेटिक हॉकी टर्फ, रामनगरमधील १०० खाटांचा वृद्धाश्रम आणि भेलूपूर जलशुद्धीकरण प्रकल्पातील 1 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. तसेच पंतप्रधान सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तिबेटन स्टडीजमधील सोवा रिग्पा भवन आणि रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे सोवा रिग्पा भवन आणि रुग्णालय पारंपरिक वैद्यकशास्त्राला आधुनिक आरोग्यसेवा प्रणालींशी जोडण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

पंतप्रधान सुमारे ५३०० कोटी रुपयांच्या ११२ हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी करतील. यात अमृत 2.0 अंतर्गत तेरा मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा योजना, श्री शिव प्रसाद गुप्ता विभागीय जिल्हा रुग्णालयात ५०० खाटांचे मल्टी-सुपर-स्पेशालिटी रुग्णालय, भोजुवीर आणि सिगरा येथे बाजार संकुल आणि कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम, तलावांचे नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन, 198 खाटांच्या रुग्णालयाचा पुनर्विकास, शंभर खाटांच्या क्रिटिकल केअर ब्लॉकचे बांधकाम, आणि अस्सी घाट, दशाश्वमेध घाट तसेच नमो घाट यांसारख्या प्रमुख घाटांवर पर्यटन सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. प्रशासन आणि सामाजिक कल्याण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान रामनगर येथे एकात्मिक विभागीय कार्यालय, नगर निगम कार्यालय इमारत तसेच शासकीय बालसंरक्षण गृह आणि ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाच्या इमारतीचे भूमिपूजन देखील करणार आहेत.

पंतप्रधान बनास डेअरीशी संबंधित उत्तर प्रदेशातील दूध पुरवठादारांना बोनस म्हणून १०५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करतील. पंतप्रधान वाराणसी जंक्शन–पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाची पायाभरणी करतील, यात गंगा नदीवरील रेल्वे-कम-रोड पुलाच्या बांधकामाचाही समावेश आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे वाहतूकीची कोंडी कमी होऊन लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढेल, बहु आयामी संपर्क प्रणाली बळकट होईल. यांचा लाभ वाराणसी आणि चंदौली जिल्ह्यांना होईल, काशी विश्वनाथ धाम, रामनगर परिसर आणि राष्ट्रीय महामार्ग-१९ पर्यंत पोहोचणेही सोपे होईल, तसेच पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारसोबतची रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल.

पंतप्रधान बनारस–पुणे (हडपसर) आणि अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील. या गाड्यांमुळे प्रवासाचे किफायतशीर आणि आधुनिक पर्याय उपलब्ध होतील तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील संपर्क वाढेल. बनारस-पुणे रेल्वेमुळे काशी विश्वनाथ धामला जाणे अधिक सुलभ होईल, तर अयोध्या-मुंबई गाडीमुळे श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्राशी संपर्क व्यवस्था सुधारेल आणि प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देणे सुलभ होईल.

पंतप्रधान हरदोई जिल्ह्यात गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन करणार असून, देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गंगा द्रुतगती मार्ग ही ५९४ किलोमीटर लांबीची, सहा-पदरी (आठ  पदरांपर्यंत विस्तारयोग्य), प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड उच्च वेग मार्गिका असून, यासाठी सुमारे ३६२३० कोटी रुपये खर्च आला आहे. हा द्रुतगती मार्ग बारा जिल्ह्यांमधून जातो. मेरठ, बुलंदशहर, हापूर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहानपूर, हरदोई , उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराजचा यात समावेश असल्यामुळे उत्तर प्रदेशातील पश्चिम, मध्य आणि पूर्व भागांना एका अखंड अतिजलद मार्गाने जोडतो.

या प्रकल्पामुळे मेरठ ते प्रयागराज दरम्यानचा प्रवास वेळ सध्याच्या बारा तासांवरून सुमारे सहा तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा असून यामुळे प्रवास सुलभ होईल आणि वाहतूक कार्यक्षमता वाढेल. या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शाहजहानपूर जिल्ह्यात साडेतीन  किलोमीटर लांबीच्या आपत्कालीन विमान उतरण्याच्या सुविधेची उभारणी. या दुहेरी उपयोगाच्या सुविधेमुळे राष्ट्रीय सुरक्षेची तयारी अधिक मजबूत होईल आणि आर्थिक फायद्यांपलीकडे धोरणात्मक महत्त्व वाढेल. गंगा द्रुतगती मार्ग ही एक महत्त्वाची आर्थिक मार्गिका म्हणून विकसित करण्याचा उद्देश असून, त्याच्या मार्गावरील १२ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६३५ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक उत्पादन आणि लॉजिस्टिक मार्गिका विकसित केली जाणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल, पुरवठा साखळीची कार्यक्षमता सुधारेल आणि उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढेल.

सुधारित संपर्कामुळे शेतकऱ्यांना शहरी आणि निर्यात बाजारपेठांशी थेट जोडणी मिळेल. यामुळे त्यांना चांगल्या किंमती मिळण्यास मदत होईल आणि ग्रामीण उत्पन्नात वाढ होईल. या प्रकल्पामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि प्रदेशात थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल. गंगा द्रुतगती मार्ग हा राज्यातील व्यापक जलदमार्ग जाळ्याचा कणा ठरेल. यामध्ये आग्रा ते लखनऊ द्रुतगती मार्ग , जेवर जोडणी द्रुतगती मार्ग, फर्रुखाबाद जोडणी द्रुतगती मार्ग आणि मेरठ ते हरिद्वार प्रस्तावित विस्तार यांसारखे अनेक जोड मार्ग कार्यरत किंवा नियोजित आहेत. या विकसित होत असलेल्या द्रुतगती मार्ग जाळ्यामुळे उत्तर प्रदेशात पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशांनी अतिजलद रस्ते संपर्क वाढेल आणि संतुलित प्रादेशिक विकास साध्य होईल. गंगा द्रुतगती मार्ग हा केवळ वाहतूक प्रकल्प नसून एक परिवर्तनकारी उपक्रम आहे, जो लॉजिस्टिक खर्च कमी करेल, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करेल, शेती आणि ग्रामीण उत्पन्न वाढवेल, रोजगार निर्माण करेल आणि राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला गती देईल.

Comments
Add Comment