Saturday, April 25, 2026

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेल्या मराठी विज्ञान परिषद या संस्थेला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याची नोंद.

इ स. १९५७ साली रशियाने पाठवलेल्या जागतिक पहिल्या कृत्रिम उपग्रह, ‘स्फुटनिक’चे अवकाशात उड्डाण, चीन व पाकिस्तानबरोबरची युद्धे, १९६४-६५ साली घडवून आणलेली हरितक्रांती, अशा विविध घटना घडत होत्या. या गोष्टींविषयीचे लोकांमध्ये कमालीचे कुतूहल होते. पण या घटनांचे विश्लेषण करणारी यंत्रणा किंवा संस्था त्यावेळी नव्हती. या विषयांबद्दल बातम्या यायच्या पण त्या इंग्रजीमधून. स्थानिक लोकांना कळावे यासाठी या घटनांचे स्थानिक भाषेतून विश्लेषण करण्यासाठीची गरज ओळखून काही मान्यवर व्यक्तींनी एकत्र येऊन १९६६ साली मराठी विज्ञान परिषदेची स्थापना केली.

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेली ही संस्था गेल्या ६० वर्षांत चहुबाजूने वाढत गेली. याला त्यावेळचे संस्थापक व त्यांनी ठेवलेली दूरदृष्टी कारणीभूत आहे. परिषदेच्या सध्याच्या विश्वस्तांमध्ये डॉ. विजय केळकर, प्रमोद लेले, डॉ. वसुधा कामत, प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. अश्विनी भालेराव गांधी, डॉ. अविनाश सुपे व रावसाहेब पाटील अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांचा समावेश आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांच्याबरोबर काम करणारे कार्यकारी मंडळ आणि स्थायी समिती असा व्यवस्थापनाचा दुसरा स्तर आहे. परिषदेचे सध्याचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी आहेत, तर पूर्वाध्यक्षांमध्ये डॉ. रा. वि. साठे, म. ना. गोगटे, प्रा. भालचंद्र उदगावकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, प्रभाकर देवधर यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.

अ. पां. देशपांडे, डॉ. दिलीप हेर्लेकर, प्रा. भालचंद्र भणगे हे मान्यवर १९९२ चे राष्ट्रीय विज्ञान पारितोषिक, २०११ सालचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार आणि २०१८चा कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार विजेत्या ‘मराठी विज्ञान परिषदे’ला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याची ही ओळख.

परिषदेचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. ही सर्व मंडळी स्वेच्छेने विनामोबदला परिषदेच्या कार्यात मग्न आहेत. शिवाय १४ जणांचा पूर्णवेळ कर्मचारी चमू परिषदेत सध्या कार्यरत आहे. स्वतःच्या दोन मजली वास्तूत शीव चुनाभट्टी येथे परिषदेचे मुख्य कार्यालय असून तालुका पातळीवर संपूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर बडोदा, गोवा व निपाणी येथे एकूण ६८ विभाग कार्यरत आहेत. मराठी भाषेतून विज्ञानप्रसार करणे, विज्ञान प्रसाराचे काम प्रभावीपणे करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे आणि विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देणे ही मराठी विज्ञान परिषदेची मुख्य उद्दिष्टे आहेत. बदलत्या काळानुसार आणि पालकांच्या मागणीनुसार मराठी भाषेबरोबर आता हिंदी, इंग्रजीमधूनही विज्ञानप्रसार केला जातो.

अलीकडे काही वर्षांत आपल्या शिक्षणातली परिस्थिती बदलत आहे. पूर्वी फक्त लिखाण आणि पाठांतरावर भर दिला जायचा. पण त्याबरोबर प्रत्यक्ष कृतीला महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांना प्रकल्प देऊन संकल्पना अनुभवातून समजावून दिल्या जातात. विज्ञान विषयातील संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग करणे अत्यंत उपयुक्त ठरते. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे आपल्या मुलाचा पाया भक्कम व्हावा, अभ्यासात हुशार असावे असे प्रत्येक पालकाला वाटते. एवढेच नाही तर पुढे जाऊन स्वतःच्या करिअरमध्येही अग्रेसर राहावे असे वाटते. अशा सुजाण पालकांना दिलासा देण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेत विज्ञान अनुभूती, विज्ञान प्रयोग मेळावा, विज्ञान खेळणी अशा कृतिशील कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच सध्याच्या आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या विज्ञान संकल्पना स्पष्ट व्हाव्यात व त्यासाठी तयारी करून घेण्यासाठी बालवैज्ञानिक ऑनलाईन अभ्यासक्रम व बालवैज्ञानिक प्रयोग सराव कार्यशाळा घेतल्या जातात. आपल्या देशातील समस्या सोडवण्यासाठी देशातच संशोधन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे म्हणून शालेय तसेच महावियालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनातील संधींची माहिती करून देण्याच्या उद्देशाने पीएच.डी.साठी संशोधन करणारे किंवा नुकतेच संशोधन पूर्ण केलेले रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधक ग्रामीण भागांतील शाळांमध्ये जाऊन ‘संशोधनाकडे वळा’ या कार्यक्रमांतर्गत व्याख्याने देतात. मूलभूत विज्ञान व गणित या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या हुशार पण गरजू विद्यार्थ्यांना परिषदेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. शनिवारी विज्ञानवारी या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या सहयोगाने ग्रामीण भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांतून विज्ञान संकल्पना समजावून दिल्या जातात. परिषदेच्या विज्ञान भवनाच्या गच्चीवर शहरी तंत्राने भाज्या, फुले, फळे यांची लागवड केलेला बगीचा उभारला आहे. घरातील जैविकदृष्ट्या विघटनशील कचऱ्याचा वापर करून गच्चीत किंवा बाल्कनीत, जिथे सूर्यप्रकाश असेल तिथे भाज्या, फळे यांचे उत्पादन घेता येते. या तंत्राची ओळख करून देणारे ‘शहरी शेती ओळख वर्ग’ दर महिन्याच्या पहिल्या रविवारी घेतले जातात. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘विज्ञानम् जनहिताय’ या मालिकेत विज्ञानातील विविध विषयांवर कार्यक्रम चालू आहे. स्थानिक लोकांना मान्यवर वैज्ञानिकांशी संवाद साधता यावा व तेथील समस्यांवर चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने दरवर्षी न चुकता वेगवेगळ्या ठिकाणी परिषदेचे ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन’ होत असते. अशा प्रकारे मराठी विज्ञान परिषदेचे काम अखंडपणे गेले ६० वर्षे स्वबळावर चालू आहे.

१९६७ पासून परिषदेचे ‘पत्रिका’ हे मासिक सुरू आहे. दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञानविषयक सदरे या मासिकात आणि विविध वर्तमानपत्रांतून प्रकाशित होत असतात. याचबरोबर परिषदेने मराठी व इंग्रजीतून पुस्तके प्रकाशित केली आहेत. परिषदेला कायमस्वरूपी कोणतेही अनुदान नाही. मुख्यत्वे देणग्या, वर्गण्या, प्रायोजकत्व, जाहिराती, निधीवरचे व्याज, कार्यक्रमाचे मिळणारे शुल्क यावर परिषदेचे आर्थिक नियोजन केले जाते. प्रबोधनाच्या मार्गाने काम करणाऱ्या परिषदेकडून समाजाच्या अजूनही अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी परिषदेला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळो, हीच अपेक्षा!!

(लेखिका मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान अधिकारी आहेत.)

Comments
Add Comment