राजरंग – राज चिंचणकर
मराठी रसिकजनांच्या आयुष्याचा ‘नाटक’ हा अविभाज्य घटक आहे. निखळ मनोरंजन करणाऱ्या नाटकांपासून सामाजिक, वैचारिक, विनोदी, रहस्यमय, कौटुंबिक अशी विविध प्रकारची नाटके रंगभूमीवर येतात आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी ‘मायबाप’ रसिकांचे पाय नाट्यगृहांकडे वळतात. वर्षाचे बाराही महिने रंगभूमीवर नाटके सुरू असतात. आठवड्याचा लेखाजोखा मांडला तर प्रामुख्याने वीकेण्डला, म्हणजे शनिवार-रविवारी नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर लागतात. त्यातही सार्वजनिक सुट्टीचे दिवस आणि सणासुदीचा मुहूर्त आला की, नाटकांचा जोर अधिक असतो.
सणासुदीचे प्रतिबिंब ज्याप्रमाणे समाजातल्या विविध घटकांवर पडलेले दिसते; त्याचप्रमाणे नाट्यसृष्टीवरही या दिवसांचा अंमल चढलेला दिसतो. सध्याचा नाट्यव्यवसाय हा बऱ्याच अंशी वीकेण्डवरच अवलंबून असताना, अशा वीकेण्डला जोडून एखादी सुट्टी आली; तर नाट्यसृष्टीसाठी तो दुग्धशर्करा योग मानला जातो. आता यावेळी शनिवारचा मुहूर्त साधून आलेला दसरा आणि दुसऱ्या दिवशीचा रविवार नाट्यसृष्टीसाठी अर्थातच महत्त्वाचा आहे. सध्या रंगभूमीवर काही पुनरुज्जीवित नाटके सुरू आहेत; तर काही नवीन नाटकांनी रंगभूमीवर ताल धरला आहे. काही नाटकांचे शुभारंभही या काळात होत आहेत. त्यांच्यासाठी तर दसऱ्याचा हा मुहूर्त महत्त्वाचा मानला जात आहे. शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यात दसऱ्याचा बोनस मिळाल्याने हा वीकेण्ड म्हणजे नाटकांसाठी बहराचा काळ आहे. अशी संधी व्यावसायिक नाटकवाले सोडणे शक्यच नसल्याने, या वीकेण्डला विविध नाट्यगृहांत मराठी नाटकांचे धडाक्यात प्रयोग लावण्यात आले आहेत. त्यामुळे या वीकेण्डला निदान नाट्यगृहे तरी नाट्यप्रयोगांनी ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, शनिवार-रविवार आणि दसऱ्याचा मुहूर्त साधत नाट्यरसिकही नाट्यगृहांच्या पायऱ्या उत्साहाने चढतील; अशी अपेक्षा आता व्यक्त झाली तर त्यात नवल नाही. श्री शिवाजी मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, कालिदास नाट्यगृह ही व अशी अनेक नाट्यगृहे मिळून सकाळ, दुपार व रात्रीचे नाटकांचे प्रयोग या काळात लावण्यात आले आहेत. या प्रयोगांमुळे नाट्यगृहे तर ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत; आता रसिकजनही या नाटकांना ‘हाऊसफुल्ल’ गर्दी करतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.