डॉ. अनन्या अवस्थी
सप्टेंबरमध्ये, भारताने ७वा राष्ट्रीय पोषण महिना २०२४ साजरा केला, हा महिना पोषणविषयक जनजागृती आणि उपाययोजनांसाठी समर्पित आहे. हा एक असा पैलू आहे जो अतिशय महत्त्वाच्या पूरक आहारावर सामूहिक भर देण्याची गरज अधोरेखित करतो. अर्भकांना संपूर्ण स्तनपानापासून घन आणि अर्ध-घन पदार्थांचा समावेश असलेल्या आहाराकडे नेणारे हे संक्रमण भारतात सातत्याने आढळणाऱ्या कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक मूलभूत उपाय आहे. पूरक आहार हा विषय केवळ अन्नापुरता मर्यादित नाही; बालकांना योग्य वेळी योग्य पोषक तत्त्वे मिळतील हे सुनिश्चित करण्याशी संबंधित आहे ज्यामुळे निरोगी आणि उत्पादक जीवनाचा पाया घातला जाईल. केवळ दूध, वाढत्या वयातील बालकांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करू शकत नसल्यामुळे, जागतिक आरोग्य संघटना ६ महिन्यांच्या वयापासून पुरेशी पोषणमूल्ये असलेले आणि सुरक्षित असलेले पूरक अन्न, २ वर्षे किंवा त्यापुढील वयापर्यंत स्तनपान सुरू ठेवण्याची शिफारस करते. मेंदूचे कार्य, शारीरिक वाढ आणि प्रतिकारशक्तीच्या विकासामध्ये पूरक आहाराची प्रमुख भूमिका असल्याने पूरक आहार अतिशय महत्त्वाचा आहे. मेंदूच्या विकासाविषयीच्या शास्त्रीय पुराव्यांवरून असे दिसून येते की, जन्मानंतर दोन वर्षांच्या आत, मेंदूचे आकारमान १००% पेक्षा जास्त वाढते, जे प्रामुख्याने मेंदूमधील ग्रे मॅटरच्या विकासामुळे होत असते.
त्याच प्रकारे बाळाच्या जन्मानंतर पहिल्या वर्षात त्याचे वजन जवळपास तिप्पट होते. म्हणूनच, पूरक आहार हा केवळ मेंदूच्या विकासासाठीच आवश्यक नाही तर बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी देखील गरजेचा आहे, कुपोषणाचा हा परिणाम भारतातील पाच वर्षांखालील जवळजवळ एक तृतीयांश बालकांध्ये दिसून येतो. बालकांमधील कुपोषणामुळे खुजेपणा, वेस्टिंग आणि अंडरवेट अशी लक्षणे दिसून येतात, ज्यामुळे वाढत्या वयातील बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर विपरित परिणाम होतात. याचे उदाहरण म्हणजे संशोधनातून असे दिसून आले आहे की, ‘स्टंटेड’ बालकांना परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता जास्त असते, त्यांची आकलन क्षमता कमी असू शकते आणि त्यामुळे पुढच्या आयुष्यात आर्थिक उत्पादकता देखील कमी होऊ शकते. अतिशय उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी देखील पूरक आहार महत्त्वाचा असतो. अतिसार, श्वसनविकार आणि अन्नविषयक ऍलर्जी या समस्या अशा बालकांमध्ये नेहमी दिसून येतात. बालकांच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षे अतिशय महत्त्वाचा कालखंड म्हणावा लागेल ज्यामध्ये योग्य प्रकारचे पोषण आपल्या भावी पिढ्यांची शारीरिक वाढ, आकलन क्षमता आणि प्रतिकार क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढवू शकते. अतिशय जास्त महत्त्वाचा असा हा कालखंड आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे असलेली फळे आणि भाज्या, कडधान्ये, शेंगावर्गातील भाज्या, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश बालकांच्या आहारात असला तर त्यामुळे बालकांचे आरोग्य दीर्घ काळ टिकून राहण्यास मदत होते. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतातील अगदी लहान बालकांच्या आहारात पूरक आहाराचा समावेश वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात?
पूरक आहाराचा योग्य प्रकारे समावेश करण्यात यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम निरोगी आणि पोषणमूल्ये असलेल्या अन्नाचा समावेश विशेषतः सहा महिने ते दोन वर्षे या वयामध्ये असा आहार समाविष्ट झाला पाहिजे. भारताच्या समृद्ध पाकशास्त्रामध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे पोषणमूल्यांनी समृद्ध आहेत आणि लहान बालकांसाठी उत्तम आहेत. खिचडी आणि दलिया यांसारख्या पारंपरिक पाककृती केवळ तयार करायलाच सोप्या नाहीत, तर आवश्यक पोषक तत्त्वांनी देखील परिपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, नाचणी आणि केळीची लापशी लोह आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे, तर बाजरीची खिचडी जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे उत्तम मिश्रण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या मिशन पोषण २.० च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये “आहारातील विविधता” आणि ताजी फळे, भाज्या, भरड धान्ये आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध, पौष्टिक आणि प्रादेशिक परिस्थितीला अनुकूल असलेल्या परिपूर्ण अन्नपदार्थांच्या वापरावर मोठा भर देण्यात आला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित, स्थानिक पातळीवर उपलब्ध आणि परवडणाऱ्या घटकांपासून बनवलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे पुनरुज्जीवन केल्याने बालकांना त्यांच्या वाढीला आणि विकासाला मदत करणारा संतुलित आहार मिळेल हे सुनिश्चित होत आहे.
दुसरे, म्हणजे सामाजिक आणि वर्तवणुकीतील बदलांना चालना देण्यासाठी शास्त्रीय संदेश प्रसारित करण्यासाठी सांस्कृतिक मंचांचा वापर करणे हे देखील एक महत्त्वाचे प्रमुख धोरण ठरू शकते. विशेषतः जन्माच्या सहा महिन्यांनंतर पूरक आहार सुरू करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली वेळ, भारतीय सांस्कृतिक संदर्भांमध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा मानल्या गेलेल्या ‘अन्नप्राशन’ या पारंपरिक प्रथेशी उत्तम प्रकारे जुळत आहे. पूरक आहाराचे महत्त्व ओळखून, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय, माता आणि स्थानिक समुदायांना बालकांच्या आहारात वैविध्यपूर्ण आणि पौष्टिक-समृद्ध अन्नाचा परिचय करून देण्याचे महत्त्व देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगावे यासाठी समुदाय-आधारित कार्यक्रम म्हणून अन्नप्राशन दिवस साजरा करण्यास प्रोत्साहन देते. अर्भके आणि बालकांना आहार देण्याच्या शास्त्रीय संशोधनात सिद्ध झालेल्या निष्कर्षावर आधारित पद्धतींचा अंगीकार करण्यासाठी आणि त्यांचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी पारंपरिक विद्वत्ता आणि सामाजिक-सांस्कृतीक पद्धतींचा अवलंब एक उत्तम कार्यक्रम ठरू लागला आहे.
सरतेशेवटी, पूरक आहार हा ७ व्या पोषण माह २०२४चा एक महत्त्वाचा भाग होता, जो केंद्रीय माता आणि बाल पोषणाच्या सर्वात दुर्लक्षित पैलूंपैकी एक आहे. शास्त्रीय निष्कर्षांवर आधारित पद्धतींचा प्रचार करून, अन्नप्राशनसारख्या सांस्कृतिक परंपरांचा लाभ घेऊन, परवडणाऱ्या आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध खाद्यपदार्थांच्या पाककृतींचा प्रसार करून आणि बालकांचे अनारोग्यदायी खाद्यपदार्थांपासून संरक्षण करून, भारत कुपोषण निर्मूलनासाठी आपल्या प्राधान्यक्रमाच्या उद्दिष्टांच्या दिशेने लक्षणीय टप्पे गाठू शकतो. लोकचळवळ किंवा समुदायांची एकजूट यांच्या जोडीने होत असलेले सरकारचे हे प्रयत्न, सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आवश्यक असलेले पोषण सर्व बालकांना उपलब्ध होईल आणि त्यायोगे देशाच्या निरोगी भविष्याचा पाया घातला जाईल, हे सुनिश्चित करतील.