मुंबई: आज ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस देवी मातेची पुजा-आराधना केली जाते. तसेच उपवासही केले जातात. अनेकजण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण पहिला आणि शेवटच्या दिवशी उपवास करून नवरात्रीची सांगता करतात.
घटस्थापनेचा मुहूर्त
शारदीय नवरात्रीला घटस्थापनेच्या नंतर नवरात्रीची सुरूवात होते. यावर्षी घटस्थापनेचे दोन शुभ मुहूर्त आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत पहिला मुहूर्त आहे.त्यानंतर दुपारी १२.०३ वाजल्यापासून ते दुपारी १२.५१ वाजेपर्यंत दुसरा मुहूर्त आहे.
घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करा. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. जिथे तुम्ही घटाची स्थापना करणार आहात तेथे साफसफाई करून गंगाजल शिंपडा. त्यानंतर विधीवत घटाची स्थापना करा.
नवरात्रीचा पहिला दिवस
शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री मातेला समर्पित आहे. देवी सतीच्या रूपात आत्मदहन केल्यानंतर देवी पार्वतीने पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेतला. संस्कृतमध्ये शैलचा अर्थ पर्वत म्हणून देवीला पर्वताची पुत्री म्हणून शैलपुत्री असे ओळखले जाते.