पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
पुणे : पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो (Underground Metro) मार्गाचे लोकार्पण होणार होते. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यामुळे आजपासून पुणेकरांच्या सेवेसाठी पुण्यातील पहिली भुमिगत मेट्रो सज्ज झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे भुमिगत मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली होती. आज सायंकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशासाठी खुला करण्यात येणार आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट अशी ४ मेट्रो स्थानके आहेत.
या कामाचे उद्घाटनही पार
पंतप्रधान मोदींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भिडे वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन देखील करण्यात आले. तर राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
तिकीट दर काय?
- जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ: १० रुपये
- जिल्हा न्यायालय ते मंडई: १५ रुपये
- जिल्हा न्यायालय ते स्वारगेट : १५ रुपये
- स्वारगेट ते मंडई: १० रुपये
- स्वारगेट ते कसबा पेठ: १५ रुपये
- स्वारगेट ते जिल्हा न्यायालयः १५ रुपये