Thursday, June 4, 2026

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि खासगी वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले असून, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ३० जून २०२६ पर्यंत ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धनवे यांनी माहिती दिली आहे. (HSRP Number Plates)

वाहनांची ओळख अधिक सुरक्षित करणे, बनावट नंबर प्लेट्सना आळा घालणे तसेच वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे या उद्देशाने केंद्र सरकारने HSRP प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे निर्धारित मुदतीत नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांवर भविष्यात दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (HSRP Number Plates)

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही विशेष तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेली नंबर प्लेट असते. या प्लेटवर लेझर कोड, क्रोमियम आधारित होलोग्राम, कायमस्वरूपी लॉकिंग सिस्टम आणि युनिक ओळख क्रमांक असतो. त्यामुळे वाहनाची ओळख पटवणे अधिक सोपे होते आणि बनावट नंबर प्लेट तयार करण्यावर प्रभावी नियंत्रण मिळते. (HSRP Number Plates)

१ एप्रिल २०१९ नंतरच्या वाहनांना आधीपासूनच बंधनकारक :

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ६ डिसेंबर २०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांमध्ये HSRP नंबर प्लेट कंपनीकडूनच बसवून देणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे त्या तारखेनंतर खरेदी झालेल्या वाहनांमध्ये ही सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. मात्र, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या लाखो वाहनांमध्ये अद्याप पारंपरिक नंबर प्लेट्स असल्याने आता त्यांनाही HSRP बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (HSRP Number Plates)

शासकीय वाहनांसाठीही आदेश :

राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या ताब्यात असलेल्या वाहनांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. यासाठी सर्व विभागप्रमुखांना स्वतंत्र पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयांच्या अभिलेखावरील १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांवर ३० जून २०२६ पूर्वी HSRP बसवून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. (HSRP Number Plates)

HSRP चे फायदे काय?

  • वाहन चोरी रोखण्यास मदत
  • बनावट नंबर प्लेट्सना आळा
  • वाहतूक नियमांची अंमलबजावणी सुलभ
  • ई-चलान आणि डिजिटल ट्रॅकिंगमध्ये अचूकता
  • वाहनाची ओळख त्वरित पटवणे शक्य
  • राष्ट्रीय स्तरावर एकसमान नोंदणी प्रणाली
  • वाहनधारकांनी काय करावे?

परिवहन विभागाने वाहनधारकांना अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर अधिकृत केंद्रांवरून HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. अंतिम मुदतीच्या जवळ मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी हा नियम महत्त्वाचा ठरणार असून ३० जून २०२६ नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर तपासणी आणि कारवाई अधिक कडक होण्याची शक्यता आहे. (HSRP Number Plates)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >