आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्णत्वास येत असून मुंबईकरांचा प्रवासही वेगवान झाला आहे. अशातच पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्यासाठी प्रशासनाने कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे (Mumbai Coastal Road) काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाले असून आज या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या काही मिनिटांत पार करु शकणार आहे. तसेच वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास १२ मिनिटांत होणार असल्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.
दरम्यान, वांद्रे-वरळी सी लिंक कोस्टल रोडचे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसरकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.