कसं कराल प्रवेशपत्र डाऊनलोड?
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपची परीक्षा जून महिन्यात घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी परीक्षेत गैर प्रकार झाल्याने ती परीक्षा रद्द करुन पुन्हा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. सध्या नेट परीक्षा सुरु असून ३० ऑगस्टपर्यंतच्या परीक्षेसाटी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने प्रवेशपत्र जारी केली आहेत. ही प्रवेशपत्रं कशी डाऊनलोड करायची हे जाणून घेऊयात.
एनटीएने यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेशपत्र त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केली आहेत. ती डाऊनलोड करण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही केवळ तुमच्या लॉगीन डिटेल्स नोंदवून हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊ शकता. यूजीसी नेट परीक्षा २१ ऑगस्टपासून सुरु झाली असून ती ४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदावर रुजू व्हायचं असल्यास नेट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असतं. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने एनटीएकडून नेट परीक्षा घेतली जाते. ३० ऑगस्टपर्यंत होणाऱ्या परीक्षेसाठी यूजीसी प्रवेशपत्रं जारी करण्यात आली आहेत. २ ते ४ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या नेट परीक्षेसाठी प्रवेशपत्रं लवकरच जारी केली जाणार आहेत.