Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडी‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेची जय्यत तयारी

‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेची जय्यत तयारी

‘सेव्हन हिल्स’मध्ये १४ खाटा असलेला कक्ष आरक्षित

मुंबई : मुंबईमध्ये अद्याप ‘मंकीपॉक्स’चा एकही रूग्ण आढळलेला नाही. मात्र विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता सावधगिरी म्हणून मुंबई महानगरपालिकेने सेव्हन हिल्स रूग्णालयात १४ खाटा असलेला कक्ष आरक्षित ठेवला आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

जगातील काही देशात ‘मंकीपॉक्स’चा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही ‘मंकीपॉक्स’ सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विदेशातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिकेने ‘मंकीपॉक्स’चा प्रतिबंध आणि उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे.

संसर्गजन्य आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी विशेष रूग्णालय असलेल्या सेव्हन हिल्स रूग्णालयात ‘मंकीपॉक्स’ रूग्णांसाठी आरक्षित कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामध्ये १४ खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याचीही रूग्णालय प्रशासनाने तयारी ठेवली आहे. विविध देशांतून येणाऱ्या प्रवाशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात विलगीकरण, तसेच पुढील उपचाराकरिता पाठविण्यात येणार आहे.

‘मंकीपॉक्स’ संदर्भात २१ ऑगस्ट २०२४ रोजी विमानतळ आरोग्य अधिकारी, इमिग्रेशन अधिकारी, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची एकत्रित समन्वय बैठक झाली. विमानतळ आरोग्य अधिकारी विभागामार्फत ‘मंकीपॉक्स’ बाधित आफ्रिकी देशातून येणारे नागरिक, तसेच इतर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानतळ आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत आरोग्य माहिती कक्ष उपलब्ध करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -