लाहोर: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा अर्शद नदीम सातत्याने चर्चेत आहे. त्याने इतिहास रचताना ४० वर्षात पाकिस्तानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदकच जिंकून दिले नाही तर ९२.९७ मीटर थ्रो करत ऑलिम्पिकमध्येही रेकॉर्ड केला.
त्याच्या या जबरदस्त कामगिरीनंतर सगळीकडूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच पाकिस्तानचे पंजाबचे मुख्यमंत्री मरियम नवाजही मंगळवारी अर्शद नदीमला भेटण्यासाठी त्याच्या घरी गृहनगर मियां चन्नू पोहोचले. या दरम्यान त्यांनी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्शदला १० कोटी रूपयांचा चेक दिला.
मुख्यमंत्री मरियम हेलिकॉप्टरमधून मियां चन्नू येथे पोहोचले आणि अर्शदला त्याच्या घरी भेटले. येथे भालाफेकपटू स्टार आणि त्याच्या कुटुंबियांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी अर्शद आणि त्याची आई रजिया परवीन यांना शुभेच्छा दिल्या.
ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णयश मिळवल्याबद्दल त्यांनी अर्शदला १० कोटींचा चेक सुपूर्द केला. सोबतच होंडा सिविक कारही दिली. याचे स्पेशल रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. या कारचा नंबर ९२.९७ इतका आहे.
कोचलाही दिला ५० लाखांचा चेक
याशिवाय मुख्यमंत्र्यांनी अर्शद यांचे कोच सलमान इकबाल बट यांना ५० लाख रूपयांचा चेक दिला. तसेच अर्शदला दिलेल्या ट्रेनिंगबद्दल त्यांनी कौतुक केले.