Thursday, March 27, 2025

प्रेमकहाणी

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

प्रोफेसर अन्नछत्रे नव्या कॉलेजात प्राचार्य म्हणून आले नि सदावर्ते बाईंचा ऊर भरून आला. आनंदाश्रू डोळ्यांत उभे राहिले. प्रोफेसर अन्नछत्रे उमा सदावर्ते बाईंजवळ आले नि म्हणाले, “कशा आहात उमाबाई?” स्वत: व्यक्तिश: प्राचार्यांनीच विचारल्यावर उमा सदावर्ते याही वयात लाजल्या नि म्हणाल्या, “मी ठीक आहे सर. आपल्या कृपेने सर्व काही ठीक आहे.”

“अहो, मी तर आत्ता जॉईन झालोय.”
“तरी पण आपलीच कृपा.”
“ओ! ते रेको लेटर? त्याचा उपयोग झाला वाटतं?”
“त्याचाच. झाली मदत. आपलं रेकमेंडेशन होतं ना! पहिल्या फटक्यात नोकरीचं जमून गेलं या कॉलेजात.”
“तुमची हुशारी मॅडम!” सर मोकळेपणाने म्हणाले. स्टाफला जाम हेवा वाटला.
“आता ही गैरफायदा घेणार”
कुणीतरी कुजबुजलं.
“तिला सवयच आहे पुढे पुढे करायची!” आणखी कोणी मत्सरलं.
“स्वत: फक्त मराठीचे पिरियड घेते की नाही; बघा!”
“स्वत:चा भरपूर फायदा कसा करून घ्यायचा, हे बरोब्बर समजतं टवळीला. त्यात वाकबगार आहे ती.”
“मला ऑफिसात पर्सनही भेटा मॅडम! टाईमटेबलवर चर्चा करूया तुमच्या. मला पर्सनली बोलायचं आहे त्याविषयी.”
“हो सर. येतेच मी चहाच्या सुट्टीत.” उमा म्हणाली. “अहो नको. मोकळा वेळ मी करतो ना निर्माण.”
“तो कसा सर?”
“प्रोफेसर पिंपुटकर तुम्ही पर्यवेक्षक आहात ना? बाईंचा पहिला तास
अटेंड करा.”
“अहो सर, मी त्या वर्गाला
शिकवीत नाही.”

“कोण सांगतोय शिकवा म्हणून? निबंध द्यायचा झकास लिहायला. माझ्या स्वप्नातला भारत! मी शंभर रुपयांचं बक्षीस देईन पहिल्या आलेल्या निबंधाला.”
“अरे वा!” सगळे हेव्याने जळ जळ जळाले. ही एवढी उदारकी? केवळ या बयेशी बोलता यावं म्हणून. ना बा ना! तो हेवा प्रत्येक प्राध्यापकाच्या डोळ्यांत उमटला. मोठे सर तो हेवा जाणून म्हणाले, “मित्रांनो, माझी निवड करताना उमाबाईंची मला भरपूर मदत झाली आहे.”
“ती कशी?”
“ही अशी”. “परीक्षक मंडळाला त्यांनी दिली होती एक चिठ्ठी.”
“परीक्षक मंडळ?”
“तुमच्या कॉलेजचे ट्रस्टी हो! उमाबाईंना माझे विशेष गुण कोणते, असे त्यांनी विचारले.
कारण उमाबाई मला ओळखत होत्या हे त्यांना ठाऊक होते.”
“मग?”

“मग काय? पराकोटीचा प्रामाणिक, सरळमार्गी, निर्व्यसनी, प्रशिक्षित आणि कामाचा माणूस अशी माहिती उमाबाईंनी माझ्याबद्दल लिहिली.”
“इश्श!” उमाबाई लाजल्या. याही वयात छान दिसल्या.
स्टाफने उदारमनाने टाळ्या वाजवल्या.
उमाबाई घायाळ झाल्या. आनंदाने रडू लागल्या. “फार प्रेम केले आम्ही एकमेकांवर.” हेडसर म्हणाले.
समूहाला आता तोंड फुटले. समूह सुद्धा धीट झाला.
“सांगा ना!”
“लग्न होता होता राहिले.”
“का सर? का?”
“कोणती अडचण मधे आली? सांगा सर, सांगा.” समूह अधिकच धीट झाला.
“मला स्कॉलर्शिप मिळाली. फुलब्राईट शिष्यवृत्ती. परदेशात जाण्याची, लंडनला शिकण्याची संधी विद्यार्थी दशेत चालून आली. खर्च वेच लंडनवाले करणार होते. मग मी संधी सोडतो काय?”
“आम्हीही सोडली नसती सर.” समूह प्रामाणिकपणे म्हणाला.
“मग मी लंडनला गेलो. शिकलो. अभ्यासू होतोच मी! चक्क पहिला आलो. नोकरी मिळाली. रमलो. लंडनवासी झालो.”
“पण बॅचलर राहिलात सर! हॅट्स ऑफ टु यू!”
“होय. शब्दाचा सच्चा होतो.”
“दॅटस व्हेरी ग्रेट सर.”
“पण अजुनी उमाबाई अविवाहित आहेत सर.”
“काय सांगताय काय?”
“अजुनी वेळ गेली नाही सर! लग्नास तुम्ही, उमाबाई तयार. नि आम्ही सारे वऱ्हाडी तैय्यार!”
असे ते शुभलग्न कॉलेजच्या हॉलमध्ये तत्क्षणी लागले, मित्रांनो! लग्नास आणखी काय लागते?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -