मुंबई: राज्याला पावसाने सध्या चांगलेच झोडपून काढले. राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई, ठाणे, पुणे या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे.
गुरूवारीही सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून येत्या ४८ तासांत पावसाचा जोर अधिक वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुण्यामध्ये येत्या ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे कोकणात रायगड तसेच रत्नागिरीमध्येही पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील असा अंदाज आहे.
साताऱ्यामध्येही पावसाचा जोर अधिक असणार आहे. यासोबतच अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.