
विधान परिषदेत महसूल मंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : वाढत्या लोकसंख्येनुसार नवे जिल्हे आणि नव्या तालुक्यांच्या निर्मिती करण्याचा विचार सरकार करत असून, या संदर्भात अभ्यास करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला अहवाल पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी (Revenue Minister) मंगळवारी विधान परिषदेत दिली.
नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे नवीन तालुक्याची निर्मिती करा, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. मोलगी तालुक्याची घोषणा करून, त्याच्या उद्घाटनाच्या तारखाही निश्चित केल्या. परंतु काही कारणास्तव त्यावर निर्णय झाला नाही. मोलगी तालुका झाल्यास आदिवासींसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे मोलगी हा लवकरात लवकर तालुका घोषित करावा, अशी मागणी लावून धरली. आमदार महादेव जानकर यांनी पाडवींच्या मुद्द्याला पाठिंबा दिला.